
'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल
मुंबई: भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा अत्यंत बोचरी आणि धारदार टीका केली आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध जुने असले तरी, राणे यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यांवर जोरदार पलटवार केला आहे.
राज ठाकरे यांनी नुकतीच एक सभा घेतली होती, ज्यामध्ये त्यांनी 'मतदार यादीतील घोळ' आणि 'प्रगतीच्या नावाखाली मराठी माणसाला संपवण्या'वर भाष्य केले होते.
'तुम्ही मालेगाव-नळ बाजारमध्ये कधी जाणार?'
नितेश राणे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. "राज ठाकरे अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूद बोलतात. पण, अशा सभा आणि 'मत चोरीचे' आरोप लोकसभा निवडणुकीनंतर का झाले नाहीत?" असा सवाल त्यांनी केला.
राणे यांनी राज ठाकरेंच्या 'हिंदू मतदार यादी तपासा' या मुद्द्यावरही टोला लगावला. "आता तुम्हाला हिंदू मतदार यादी तपासायची आहे. मग तुम्ही मालेगाव, बेहरामपाडा, नळ बाजारमध्ये कधी जाणार आहात?" असा जिव्हारी लागणारा प्रश्न राणे यांनी विचारला.
ते पुढे म्हणाले, "हाच प्रश्न तुम्ही लोकसभेच्या वेळी का विचारला नाही? राजसाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नये, ते (उद्धव ठाकरे) वाया गेलेले मतदार आहेत. त्यांच्या नादी लागून भाजपला लक्ष्य केले जात आहे."
वाढवण बंदराला विरोध कशासाठी?
राज ठाकरेंनी वाढवण बंदर आणि अदानी समूहावर केलेल्या टीकेला राणे यांनी चुकीचे ठरवले. "कौशल्य विकासातून अनेक कामे केली जात आहेत. वाढवणच्या एका बंदरामुळे १२ लाख तरुणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. मग कोणत्या हिशोबाने वाढवण प्रकल्प वाईट आहे?" असा सवाल नितेश राणे यांनी केला.
राणे यांनी राज ठाकरेंना 'चुकीची माहिती' दिली जात असल्याचा आरोप केला आणि 'तुम्ही उद्धव ठाकरेंची भाषा का बोलत आहात?' असा प्रश्न विचारला.
राज ठाकरे यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचा उल्लेख केल्याबद्दल राणे म्हणाले की, "सरदार वल्लभभाई पटेल मोठे नेते होते. ते १९५० मध्ये वारले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ १९५६ मध्ये झाली."
बोगस मतदारांसाठी 'मोहल्ल्यात जा'
मतदार यादी स्वच्छ झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवा, या राज ठाकरेंच्या आव्हानाचाही राणे यांनी समाचार घेतला.
नितेश राणे यांनी राज ठाकरेंना वर्मी लागणारा सल्ला दिला. "जर तुम्हाला खरोखरच बोगस मतदार जाणून घ्यायचे असतील, तर सगळ्या मतदार याद्या मोहल्ल्यात जाऊन तपासा."
यावेळी त्यांनी अबू आझमींच्या विरोधात कठोर भूमिका न घेतल्याबद्दलही टीका केली. "अबू आझमीच्या कानाखाली का खेचली नाही? मानखुर्द शिवाजी नगरमधून बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढण्याचे काम आमच्या सरकारने केलेले आहे."
राणे यांनी मविआवर 'अर्बन नक्षल'ची भाषा करत असल्याचा आरोप केला. धार्मिक मुद्द्यांवरून टीका करताना ते म्हणाले, "उद्या हाजीअलीला जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा म्हटलं तर चालेल का? नमाज पढण्यासाठी यांना मशिदी कमी पडत आहेत. मोर्चे आधी मोहल्ल्यांवर काढा."
महायुतीतील 'मैत्रीपूर्ण लढती'बद्दल बोलताना राणे म्हणाले की, "अशा लढतीचा फायदा महायुतीलाच होईल. वेगवेगळं लढायचं आणि नंतर युती करायची, हे चालणार नाही. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा गटाकडे उमेदवारच नाहीत."