
मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात होते. त्यामुळे लोकलचा खोळंबा होतो आणि नागरिकांचे प्रचंड हाल होतात. विशेषत: पावसाळ्यात मध्य रेल्वेला मोठा फटका बसतो. या समस्येवर मध्य रेल्वे कायमस्वरूपी तोडगा काढणार आहे. आयआयटी मुंबईच्या शिफारशीनुसार, कुर्ला-एलटीटी परिसरात १० कोटी लिटर क्षमतेची भुयारी टाकी उभारली जाणार आहे. यामुळे रुळांवर साचलेले पाणी भुयारी टाकीमध्ये सोडण्यात येईल.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सूचनेनूसार आयआटी मुंबईकडून रेल्वे रुळांवर पाणी भरण्याची ठिकाणे व त्यावरील उपायांबाबत अभ्यास करून शिफारसी सुचवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवरील कुर्ला ते एलटीटी व पश्चिम रेल्वेवरील दादर ते लोअर परळ यादरम्यान विभागांची पाहणी करण्यात आली असून त्यात पूर व्यवस्थापनासाठी प्रभावी व परवडणाऱ्या उपायांसह पाण्याच्या प्रवाहाचे विश्लेषण करण्यात आले. याबाबत सविस्तर सर्वेक्षण अहवाल रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आला. यानुसार मुंबई महानगरपालिकेने कुर्ला-एलटीटी परिसरात १० कोटी लिटर क्षमतेची भुयारी टाकी बसवण्याची तयारी सुरू केली आहे.

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील जवान देशाचे रक्षण करत असतो. त्यांची ...
कुर्ला ते एलटीटी हा मध्य रेल्वेवरील असा भाग आहे, जिथे मुसळधार पावसाने गुडघाभर पाणी साचण्यास वेळ लागत नाही. यामुळे रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठीच साचणारे पाणी भुयारी टाक्यांमध्ये जमा केले जाणार आहे. टाकीमध्ये साठलेले पाणी पाऊस ओसरल्यावर पंपांच्या साहाय्याने समुद्रात सोडले जाईल. या प्रकल्पासाठी ५६ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
दरम्यान, सध्या सेंट झेवियर्स ग्राउंड व प्रमोद महाजन कला पार्क इथे पाणी साठवण्यासाठी टाक्या आहेत. परंतु, या टाक्यांची क्षमता कमी असल्याने पूरस्थिती निर्माण झाल्यास त्या पूर्ण भरून जातात व रुळांवर पाणी साचते. यामुळेच अहवालात इतर ठिकाणीही पाणी साठवण टाक्या उभारण्याची शिफारस करण्यात आली असून रेल्वेच्या मालकीच्या नसलेल्या जमिनींवर महानगरपालिकेकडून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.