Monday, October 20, 2025
Happy Diwali

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डचे आधुनिकीकरण, प्रवास होणार वेगवान!

कर्जत: मध्य रेल्वेने कर्जत यार्ड आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठे आणि महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे केवळ रेल्वे वाहतुकीत सुधारणा होणार नसून प्रत्येक गाडीच्या हालचालीत सुमारे १० मिनिटांची बचतही होणार आहे. हेच या प्रकल्पाचं सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या चौथ्या मार्गिकेमुळे प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक वेगळी झाली आहे.

कर्जत यार्ड आधुनिकीकरणामुळे जुनी आणि कार्यरत इलेक्ट्रिकल सिग्नल प्रणाली पूर्णपणे बदलणार असून डिजिटल प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. ही प्रणाली कम्प्यूटरवर आधारित असून ती गाड्यांची स्थिती रिअल-टाईममध्ये ट्रॅक करते. सिग्नल बदलते आणि ट्रॅक व्यवस्थापन आपोआप नियंत्रित करते. यामुळे सिग्नल बदलण्यासाठी कोणत्याही माणसाची गरज भासणार नाही. पूर्वी सिग्नल बदलण्यामध्ये जास्त वेळ जायचा.  काहीवेळा अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या चुकांमुळे गाड्या थांबून प्रवाशांचे हाल व्हायचे. मात्र आता नव्या प्रणालीमुळे अचूक संकेत मिळणार आहेत. ज्यामुळे वेळ वाचणार आहे.

या प्रकल्पाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे कर्जत आणि पलसदरीदरम्यान नवी चौथी मार्गिका सुरू करण्यात आली आहे. या नवीन लाईनमुळे प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक पूर्णपणे वेगळी होणार आहे. पूर्वी मालगाड्या आणि प्रवासी गाड्या एकाच मार्गावरून जात असल्याने सिग्नलनुसार थांबावे लागायचे. ज्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावायचा. मात्र आता स्वतंत्र मार्गिकेमुळे मालगाड्यांची हालचाल मुख्य घाट विभागापासून वेगळी ठेवता येणार आहे. त्यामुळे प्रवासी गाड्यांचा प्रवास वेळेवर होईल.

तसेच, कर्जत यार्डमध्ये रिसेप्शन आणि डिस्पॅच लाईन्सचा विस्तार करण्यात आला आहे. पूर्वी गाड्यांना ट्रॅक मोकळा होण्यासाठी वेळ लागत असे. परंतु आता या सुधारणा झाल्यामुळे एकाच वेळी अधिक गाड्या हाताळणे शक्य झाले आहे. परिणामी, कर्जत यार्डची एकूण क्षमता तब्बल २५ टक्क्यांनी वाढली आहे. या सुधारणेमुळे आता पनवेलमधून येणाऱ्या मालगाड्यांचे रिसेप्शन मुख्य लाईन्स ओलांडल्याशिवाय करता येईल ज्यामुळे वाहतुकीचा प्रवाह अखंड राहणार असून गाड्यांना थांबावे लागणार नाही. या प्रकल्पासाठी कोटींमध्ये खर्च करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment