
मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. दिवाळीच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, शिवशक्ती नगर, मच्छिमार नगर ०३, कफ परेड येथे ही दुर्घटना घडली. पहाटे ०४:१५ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. आगीमुळे घरातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे, तीन इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि इतर घरगुती वस्तूंचे नुकसान झाले.
आग लागल्याची माहिती समजताच बीएमसीच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि ही आग ०४:३५ वाजता पूर्णपणे विझवली. अग्निशमन दलासोबत, पोलीस, बेस्ट कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी घटनास्थळी पोहोचल्या होत्या.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार जणांना तत्काळ उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. यश विठ्ठल खोत (पुरुष, वय १५) यास रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. देवेंद्र चौधरी (पुरुष, वय ३०): यास रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. विराज खोत (पुरुष, वय १३) आणि संग्राम कुर्डे (पुरुष, वय २५): यास दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.