
बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या. या पार्श्वभूमीवर सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे, मात्र ती अद्याप खात्यांवर न पोहोचल्याने विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
याच संदर्भात, प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद आयोजित केली होती. या परिषदेत बोलताना त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'शेतकऱ्यांनी आमदाराला कापावे'
बच्चू कडू म्हणाले की, "आज दिवाळीच्या दिवशी आपल्याला दु:खाची परिषद घ्यावी लागत आहे. तुम्ही विचारांची लढाई सोडून जाती-पातीची लढाई सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांवर ही वाईट वेळ आली आहे."
शेतकरी कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी एक शेतकरी म्हणून एकत्र येऊ शकत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "याचा निळा, त्याचा भगवा, कुणाचा हिरवा, कुणाचा पिवळा.. या सर्व रंगाचे कापड आमच्या शेतक-याच्या कापसापासून बनते," असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिले. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी जीव तोडून काम केले, त्यांचीही राखरांगोळी झाली. त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली आणि हिंगणघाटच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनीच त्यांना पाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही निवडणुकीत पराभूत करण्यात आले होते, असे कडू म्हणाले.
आज शेतकरी संकटात आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. पण त्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावे (मारून टाकावे)? असे वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा पलटवार
बच्चू कडू यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर टीका केली आहे.
दरेकर म्हणाले, "बच्चू कडू यांनी बावळटपणा (बालिशपणा) सोडून सामाजिक काम करावे. अन्यथा, कापून टाकू, झाडून टाकू हे प्रकार त्यांच्यासोबत होऊ नयेत."