
इंदूर: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये यजमान भारताला रविवारी इंग्लंडविरुद्धच्या थरारक सामन्यात अवघ्या ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताचा हा सलग तिसरा पराभव होता, ज्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाची समीकरणे आता अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
भारताविरूद्धच्या विजयानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. तर, भारताचा सलग तिसरा पराभव झाल्यामुळे उपांत्य फेरीतील चौथा आणि शेवटचा स्पॉट मिळवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे.
भारताने आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांत २ विजय आणि ३ पराभवांसह ४ गुण मिळवले आहेत. गुणतालिकेत ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. भारताचे पुढील सामने न्यूझीलंड (२३ ऑक्टोबर) आणि बांगलादेश (२६ ऑक्टोबर) विरुद्ध नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर होणार आहेत.
न्यूझीलंडविरुद्धचा पुढील सामना भारतासाठी 'करो वा मरो' असा असेल. या सामन्यातील विजय भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित करेल.सामन्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने पराभवाबद्दल दुःख व्यक्त केले. "आम्ही खूप मेहनत घेतली, पण शेवटच्या ५-६ षटकांमध्ये योजना व्यवस्थित अंमलात आणू शकलो नाही. मानधनाची विकेट हा टर्निंग पॉईंट होता," असे ती म्हणाली. मानधनानेही चुकीच्या शॉट निवडीची जबाबदारी स्वीकारली.
हा पराभव अतिशय निराशाजनक असला तरी, भारताची उपांत्य फेरीची आशा अजूनही कायम आहे, परंतु त्यासाठी त्यांना आपल्या शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.