Saturday, October 18, 2025
Happy Diwali

खरी पूजा

खरी पूजा

कथा : रमेश तांबे

अजितच्या घराजवळच गणपतीचं एक मंदिर होतं. त्याची आजी दररोज सकाळी पूजेसाठी मंदिरात जायची. जवळजवळ तासभर पूजाअर्चा करायची. तिला देवाधिकांचं, मंदिरांचं खूपच वेड होतं. तिच्या अनेक आरत्या पाठ होत्या. घरात रोज चालणाऱ्या आरतीमध्ये आजीचाच आवाज मोठा असायचा. रोजची पूजादेखील अगदी व्यवस्थित व्हायला हवी यासाठी ती नेहमीच जागरूक असायची. वेगवेगळ्या धार्मिक पुस्तकांचं दररोज वाचन करणं हा तिचा छंदच होता. अजितला नेहमीच नवल वाटायचं की आपली आजी एवढा वेळ पूजा का करते. दिवसभर धार्मिक पुस्तकेदेखील वाचते. शिवाय देवाच्या कामात आळशीपणा केला तरी आजीला खूप राग येतो. आजच्या विज्ञान युगातही आपली आजी अशी का? अजितचं आपल्या आजीबद्दल तितकसं चांगलं मत नव्हतं. आजीने सांगितलेली कामेदेखील तो तशी नावडीनेच करीत असे.

एके दिवशी आजीला पूजेसाठी जास्वंदाची फुलं हवी होती. तिने अजितला हाक मारली आणि म्हणाली, “अरे जरा देवपूजेसाठी जास्वंदाची फुले घेऊन ये रे.” बाबांकडून पैसे घेऊन अजित निघाला. बाजारात भरपूर गर्दी होती. अनेक फेरीवाले आपापल्या फळांच्या, भाज्यांच्या, फुलांच्या पाट्या घेऊन ओळीने बसले होते. अजित एक-दोन फुलवाल्यांकडे गेला. पण त्यांच्याकडे जास्वंदच नव्हते. मग जरा इकडे तिकडे फिरल्यावर त्याला एका ठिकाणी जास्वंदाची फुलं मिळाली.

पन्नास रुपयांची जास्वंदाची फुलं घेऊन अजित निघाला. तेवढ्यात “ए मुला” असा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले, तर एक आजोबा त्याला बोलावत होते. अजित जवळ गेला आणि म्हणाला, काय आजोबा? काय मदत करू? आजोबा म्हणाले, “अरे बाळा माझा चष्मा रस्त्यात कुठेतरी पडला. मला आता नीट दिसत नाही. मला माझ्या घरी सोडतोस का? जवळच आहे माझं घर!” अजित लगेच म्हणाला, “ठीक आहे. चला आजोबा माझ्याबरोबर.” त्याने आजोबांंचा हात धरला अन् गर्दीतून वाट काढत ते हळूहळू चालू लागले. आजोबा उंचपुरे होते. त्यांच्या हातात काठी होती पण त्यांना नीट चालता येत नव्हते. ते थोडेसे वाकूनच चालत होते. आजोबांचे घर तसे फारसे दूर नव्हते; परंतु ते खूपच हळूहळू चालत होते. त्यामुळे घरी पोहोचायला जवळजवळ एक तास लागला. त्याने आजोबांना घरी सोडले, त्यांचे आशीर्वाद घेतले अन् हातातली फुलांची पिशवी घट्ट पकडून अजित धावत पळतच घराकडे निघाला.

एक तास उलटून गेला तरी अजित घरी आला नाही. तशी आजीला चिंता वाटू लागली. तिने अजितच्या बाबांना त्याचा शोध घ्यायला पाठवले. अजितची आईदेखील काळजीत पडली. आपण उगाचच अजितला फुले आणायला पाठवले असे आजीला झाले. तेवढ्यात अजित घरात आला. त्याला पाहाताच आजी ओरडली, “अरे अजित कुठे होतास एवढा वेळ? आम्ही सगळे किती काळजीत पडलो होतो इकडे!” अजितच्या आईने तर एक धपाटाच घातला त्याच्या पाठीत अन् म्हणाली, “किती नको नको ते विचार आले मनात.” मग अजित म्हणाला, “आजी पूजेला वेळ झाला म्हणून रागावू नकोस. जरा ऐक माझं, बाजारात नेमकं काय झालं ते.” मग अजितने बाजारात घडलेला सारा वृत्तांत दोघींना सांगितला. अजित बोलत असताना आजीचे डोळे भरून आले होते. तर आईचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. सर्व सांगून झाल्यावर अजित म्हणाला, “आजी ही घे जास्वंदाची फुलं अन् कर आता पूजा.” आजीने मोठ्या प्रेमाने अजितला आपल्या जवळ घेतले अन् म्हणाली, “बाळा माझी पूजा झाली बरं का! जास्वंदांच्या फुलांशिवाय... अन् ती मी नाही तू केलीस, त्या आजोबांना मदत करून! अरे वेड्या देवालादेखील अशीच पूजा आवडते बरे! मी करते तशी पूजा नाही केलीस तरी हरकत नाही बरं. पण लहान मुले, वृद्ध, अडचणीत सापडलेली माणसे यांना नेहमीच मदत करावी आणि हीच खरी देवपूजा!” दिवसाचे चार-पाच तास देवपूजेत खर्च करणाऱ्या आजीचे हे नवे आणि आधुनिक विचार ऐकून अजितला खूपच नवल वाटले.

Comments
Add Comment