Saturday, October 18, 2025
Happy Diwali

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

विशेष : लता गुठे

आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटावा अशा अनेक शिल्पाकृती आहेत. यादवांच्या कारकिर्दीचा वैभवशाली कालखंड होता, हे आजही अनेक शिल्पाकृतीवरून आपल्या निदर्शनास येते. यादवांचा मुख्य प्रधान म्हणजे, ‘हेमाडपंत’. हे एक विद्वान वास्तुविशारद होते. हेमाडपंथी शैलीची मंदिरे आपल्याला डोंगराच्या ठिकाणी किंवा पठारावर कुठेही आढळतात. नदीकाठी दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करून, इतर कुठलाही आधार न घेता, दगडांची कलात्मक रचना करून मंदिरं बांधण्याची कला या वास्तु-विशारदाने प्रचलीत केली. त्यामध्ये अनेक ठिकाणी असलेली दगडी महादेव मंदिरे, वेरूळ अजिंठा यांसारख्या लेण्या, गुंफा व त्यात कोरलेली मंदिरं आहेत आणि या सर्व वास्तू अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीचा एक अजोड नमूना आहे.

या लेखातून आज मी कोल्हापूर येथील कोपेश्वर मंदिराविषयी माहिती सांगणार आहे, कारण या मंदिराला जागतिक वारसा लाभलेला आहे.

कोपेश्वर मंदिर महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी आहे. कृष्णा नदीच्या काठावर निसर्गरम्य अशा परिसरामध्ये हे भव्य-दिव्य मंदिर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. ही अतिशय सुंदर शिल्पाकृती महाराष्ट्रात आहे यावर आपला विश्वासही बसत नाही. सर्व बाजूने हे मंदिर पाहताना आपण दंग होऊन जातो. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दगडामध्ये कोरलेली महादेवाची मंदिरं आहेत; परंतु या मंदिराचे वेगळेपण म्हणजे या मंदिराला ‘स्वर्ग मंडप’ आहे, तो पाहून त्या काळातील वास्तुशास्त्र जाणत असलेले रचनाकराचे खूप कौतुक वाटते. हे मंदिर आज कालचे नसून या मंदिराला आठशे ते हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. ते शिलाहार शिल्पस्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना समजला जातो. संपूर्ण मंदिराचे दगडी बांधकाम आहे त्यामुळे ते आजही सुस्थितीत आहे. हे मंदिर १८ भव्य दगडी खांबावर उभे आहे. प्रत्येक काम अतिशय सौंदर्यपूर्ण कोरीव काम केल्यामुळे व प्रत्येक खांब सारखा जराही त्यामध्ये फरक नाही. त्याची आकार रचना सर्वकाही अप्रतिम आहे.

या मंदिराचे वर्णन ‘पाषाणातील काव्य’ असे केले जाते. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे मंदिर महत्त्वाचे आहे, म्हणूनच याची गणना जागतिक वारशामध्ये झाली आहे. चला तर मग प्रत्यक्ष मंदिरातच फेरफटका मारूया... कोल्हापूरपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेले हे कोपेश्वर मंदिर. हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे‌. १२ व्या शतकात शिलाहार राजा गंदरादित्य याने बांधले होते, जे स्थापत्यशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या अद्भुत ज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे.

हे मंदिर भगवान शिव आणि श्री विष्णू या दोघांनाही समर्पित आहे आणि या मंदिरात कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश थेट रंग शिलेवर पडतो. या शिल्पकाव्याला प्रथम नमन करून मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करतात. पवित्र कृष्णा नदीचे दर्शन घडते. या मंदिरासाठी अतिशय सुरेख असा परिसर निवडलेला आहे. गाभाऱ्यात जाण्यापूर्वी बाहेरच्या रचनेवर आपले लक्ष वेधले जाते आणि बाहेरच्या खांबावर कोरलेल्या मूर्तींची तोडफोड केलेली पाहून मनाला वेदना होतात. या मंदिराची एक खासियत म्हणजे इथे गाभाऱ्यात जाण्याआधी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हे एकमेव मंदिर असे आहे की इथे गाभाऱ्यासमोर नंदी नाही आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर या ठिकाणी विष्णू आणि शंकर या दोन्ही देवाचे एकाच वेळी दर्शन घडते.

याच्यामागे काय कथा असावी? हे जाणून घेण्याची मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि मी इतिहासाची पाने चाळू लागले... पुराण कथेच्या आधारावर या मंदिराचे बांधकाम झालेले आहे. कोपेश्वर मंदिरामागील पौराणिक कथा अशी आहे, पार्वतीचे वडील राजा दक्ष याने यज्ञ आयोजित केला होता; परंतु त्याने आपल्या जावयाला भगवान शंकराला आमंत्रित केले नाही. आपल्या पित्याने जाणूनबुजून पतीचा अपमान केला आहे हे तिच्या लक्षात आले. सती पार्वतीला खूप वाईट वाटले. या घटनेने तिचे मन व्यथीत झाले आणि तिने यज्ञकुंडात उडी मारून आत्मदहन केले. हे समजताच, भगवान शंकर संतप्त झाले आणि राजा दक्षाचे शिर छाटले. नंतर भगवान विष्णूंनी शिवाला शांत केले आणि दक्षाला शेळीचे डोके लावून पुन्हा जिवंत केले. असे मानले जाते की याच ठिकाणी विष्णूंने शिवाचा क्रोध शांत केला, म्हणूनच या मंदिराला ‘कोपेश्वर’ हे नाव दिले गेले. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे नंदीची मूर्ती नाही. कारण सती पार्वती तिच्या वडिलांच्या घरी जाताना नंदीवर स्वार होऊन गेली होती, त्यामुळे या मंदिरात नंदी नाही. असे मानले जाते की हा नंदी मंदिरापासून १२ किमी अंतरावर यडूर (कर्नाटक) येथे आहे. विशेष म्हणजे, यडूर येथे केवळ नंदीचे स्वतंत्र मंदिर आहे आणि फक्त नंदीचे असलेले ते एकमेव मंदिर आहे. अशी या मंदिरामागची पुराणकथा आणि त्यावर आधारित असलेले हे मंदिर.

आता मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना कशी आहे ते पाहूया... आधी उल्लेख केल्याप्रमाणे हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहे. मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेश- भिंतीवरील दोन हत्ती आपले स्वागत करतात. एका वेळी एकच व्यक्ती प्रवेश द्वारातून आत जाऊ शकेल इतकं ते अरुंद आहे.

सभा मंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भिंतीवर देव-देवतांच्या मूर्ती दिसतात. मध्यभागी, गर्भगृहात असलेले शिव कोपेश्वर शिवलिंगाचे दर्शन होते आणि उजव्या बाजूला भिंतीवर विष्णूची कोरलेली मूर्ती आहे. संपूर्ण मंदिर ९५ हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतले आहे. मंदिरात १०८ कोरीव खांब असून, त्यांच्यावर अप्रतिम नक्षीकाम आढळते. स्वर्ग मंडपात प्रवेश केल्यावर, वरच्या बाजूला एक वर्तुळाकार उघडा भाग दिसतो. त्याला ४८ हाताने कोरलेल्या खांबांचा आधार आहे. मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या परिघावर गणपती, कार्तिकेय, कुबेर, यमराज, इंद्र यांचे आणि त्यांच्या वाहक प्राण्यांचे म्हणजे मोर, उंदीर, हत्ती यांचेही सुंदर शिल्प कोरलेले आहेत. शरद पौर्णिमेला या स्वर्ग मंडपातून चांदणे संपूर्ण मंदिरामध्ये पसरते आणि आतला परिसरही लख्ख चांदण्यात नाहून निघतो. सूर्यप्रकाश आत उतरतो आणि हवा खेळती राहते.

अशाप्रकारे ऐतिहासिक वारसा असलेले हे कोपेश्वर मंदिर, यामागे केवळ धार्मिक आस्था नसून स्थापत्य आणि ऐतिहासिकदृष्ट्याही तो अनमोल ठेवा आहे. या मंदिराची भव्यता, कोरीवकाम आणि यामागील पौराणिक संदर्भ भारतीय संस्कृतीचा अद्वितीय वारसा आहे, तर आपणही या ठिकाणी जाऊन हे शिल्पकाव्य मनात कोरून घ्यावे.

Comments
Add Comment