Sunday, November 9, 2025

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

महापालिका आयुक्त थेट घरीच पोहोचले आणि त्यांच्यात यंदाच्या दिवाळीत आनंदाची लहर उमटली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी म्हणजे असे व्यक्तिमत्व जे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते तळातील सफाई कामगार यांची आपुलकी विचारपूस करणारे. त्यांच्या प्रति प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये प्रेमाची आणि आदराची भावना पहायला मिळते. याच त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी आपल्या पत्नीसह थेट कामगाराच्या घरी भेटी दिल्या. सकाळी नित्यनेमाने पाणी सोडणारा चावीवाला असो वा अग्निशमन दलाचे जवान असो यांच्या घरी ते थेट पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह संवाद साधला. आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाची लहर उमटलेली पाहायला मिळाली.

गतवर्षापासून आयुक्त भूषण गगराणी यांनी दिवाळीनिमित्त थेट कामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे दुसरे पुष्प श्री. गगराणी यांनी रविवारी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी कुर्ला येथील कामगार नगर वसाहतीत गुंफले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. शीतल गगराणी या आवर्जून उपस्थित होत्या.

मुंबईला सतत तृप्त, सशक्त आणि आनंदी ठेवण्यासाठी महानगरपालिका विविध सेवा देत सतत झटत असते. या सेवांमध्ये पाणीपुरवठा सेवा म्हणजे महानगराच्या धमन्यांमधून वाहणारा जीवनरसच. या जीवनरसाला अविरत वाहते ठेवणारे हात म्हणजे महानगरपालिकेचे ‘चावीवाले’ कर्मचारी. त्यांच्या अथक श्रमांमुळे मुंबईच्या प्रत्येक घरात हा जीवनरस पोहोचतो. याच चावीवाल्या कामगारांच्या कुर्ला कामगार नगर येथील वसाहतीला महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सदिच्छा भेट देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. आपल्या संस्थेचे प्रमुख थेट आपल्या दारी आलेले पाहून, चावीवाले, पंपचालक, कामगार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दीपोत्सवाचे रंग उजळले.

गगराणी यांनी पत्नीसह या वसाहतीत पाऊल टाकताच, वसाहतीतील कामगार आणि त्यांच्या परिवारासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी सण सुरू झाला. घरोघरी सजलेले तोरण, दारात एक-एक टिपक्यांनी गुंफलेली विविधरंगी रांगोळी आणि उजळलेले चेहरे - अशा उबदार वातावरणात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गगराणी दांपत्याचे स्वागत केले.

गगराणी दांपत्याने घरोघरी जाऊन दिवाळीचा फराळ शुभेच्छा भेट म्हणून दिला. अनेकांच्या घरात वृद्ध आई-वडील होते, लहान मुलं होती; त्यांच्याशीही गगराणी दांपत्याने गप्पा केल्या, त्यांची विचारपूस केली आणि दिवाळी सणानिमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील नात्यांची वीण आणखी घट्ट केली. ग्रामसेवक वाल्मिकी, बाबा कांबळे, बाळासाहेब गरुड, उत्तम झोरे, गौतम ससाणे या कर्मचाऱ्यांच्या घरी श्री. व सौ. गगराणी यांनी भेट दिली. सहायक आयुक्त (एम पूर्व) शंकर भोसले, उपप्रमुख अभियंता (जल अभियंता विभाग) सुशील चव्हाण आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबई अग्निशमन दलाच्या वसाहतीलाही सदिच्छा भेट

वेगाशी स्पर्धा करणाऱ्या मुंबई महानगराला सतत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या विविध प्राधिकरणांमध्ये मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल आघाडीवर आहे. मुंबईवर कोणतेही संकट आले असता, मुंबई अग्निशमन दल तत्परतेने या संकटाला सामोरे जाते आणि त्यातून मुंबईकरांची सुखरूप सुटका करते. दादर येथे मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांची वसाहत आहे. या वसाहतीलाही भूषण गगराणी यांनी पत्नीसह दिवाळीनिमित्त भेट दिली. या ठिकाणीही त्यांनी सर्व जवानांच्या परिवाराला दिवाळीचा फराळ भेट दिला आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या.

मंगेश शिवडीकर, शरद कुमावत, नारायण कोकितकर, राजेश सावंत आदी कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या घरी जाऊन गगराणी यांनी सपत्नीक दिवाळीनिमित्त भेट दिली.मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उपअग्निशमन अधिकारी अनिल परब, के. आर. राव, विभागीय अग्निशमन अधिकारी मनोज सावंत यावेळी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त म्हणतात...

मुंबईसारख्या महानगराला दररोज अनेक सेवांच्या माध्यमातून महानगरपालिका सतत जिवंत ठेवत असते. "एक कुटुंब" म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे दिवाळी सण साजरा करत असल्याचे पाहून अतिशय आनंद झाला, असे गगराणी यावेळी म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, "प्रशासनात धोरणात्मक निर्णय जरी आम्ही घेत असलो तरीही, प्रत्यक्ष शेवटच्या व्यक्तीशी लोकांचा संबंध हा यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा येतो. दिवाळी सणाच्या निमित्ताने कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळाली. यंत्रणा अहोरात्र काम करत असतानाच त्यांच्या कुटुंबियांसोबत सण साजरा करण्याची पोचपावती या भेटीच्या निमित्ताने मिळाली."

Comments

Manjula kamble    October 21, 2025 07:45 AM

Evda mota Adhikari asun tyana jara sudha garva nahi👌👍 salute tyancha padala

नरेंद्र खंदारे    October 21, 2025 07:12 AM

प्नशासनात कर्मचाऱ्यांप्रती आत्मियता बाळगणारे सनदी अधिकारी आजही आहेत. बातमी वाचून खूप बरे वाटले.

Vijaykumar kale    October 21, 2025 04:26 AM

Great sir

कांती प्रसाद बडथवाल    October 20, 2025 09:23 PM

मै तो नासिक से हॅ फिर भी मुंबई आयुक्त श्री भूषण गगरानी और उनकी धर्मपत्नी श्रीमती शीतल गगराणी की इस पहल का हार्दिक स्वागत करता हुॅ । शुभ दीपावली ।

Ashok G    October 20, 2025 06:41 AM

उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांना माणुसकी ची वागणूक देऊन त्यांच्या प्रती मुंबईकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतात हे खूप कौतुकास्पद आहे. गगराणी सर आणि मॅडम ना शत:श धन्यवाद. 🙏🏼

Devidas Pawar Dahanu Road, Palghar    October 20, 2025 05:35 AM

Gagrani dampatyanche manpurvak abhinandan, aani Happy Diwali

Vilas Shinde    October 19, 2025 12:11 PM

Great Gagarani saheb , If all officers take this initiative, common man believe in berocrats. There are some officers who works for community like you. Wishing you happy diwali

Add Comment