येता आनंदा उधाण...

प्रासंगिक : अजय पुरकर


दीपावलीच्या शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. सध्या जगण्याचे आयाम बदलले आहेत. माणूस आत्मकेंद्री होतो आहे. हा संवाद हरपलेला काळ आहे. या पार्श्वभूमीवर दीपप्रज्वलन करताना मनाचे कोपरेही उजळून टाकण्याचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. चौकटीबाहेरचे जग बघताना आपल्या मनाची चौकट भक्कम करण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे कारण सकारात्मकतेची ही प्रभावळच दीपावलीचा आनंद द्विगुणित करू शकेल.


एका मंगलमयी सणाचा प्रारंभ होत असताना दिवाळीच्या स्वागताला आपण सगळेच सज्ज आहोत. आसमंतामध्ये हा आनंद पसरत आहे, तो प्रत्येकाला जाणवत आहे. अशा रम्य वातावरणात उल्हसित चित्तवृत्तीनिशी दीपावलीचे स्वागत करत आणि यायोगे रोजच्या जगण्यामध्येही आनंदलहरी निर्माण करण्याचा संकल्प करताना सभोवताली उत्साहाचे वातावरण दाटले आहे. अलीकडे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा कल नकारात्मकतेकडे वळतो आहे. लोकांमध्ये अस्वस्थता आहे. यामागे अर्थातच अनेक कारणे आहेत. त्याच्या खोलात जायला नको. मात्र दीपावलीच्या आनंदपर्वाचा आनंद घेत असताना वाढत्या अस्वस्थते मागील कारणे शोधून दूर करण्याचा प्रयत्नही केला पाहिजे असे वाटते. खरे पाहता आज अनेकांकडे भौतिक सुखांचा आनंद घेता येईल एवढा पैसा आहे. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागवून चैनीच्या वस्तूंच्या खरेदीतून मिळणारा आनंद अनेकजण उपभोगत आहेत. पण एकीकडे असे असले तरी जवळपास सगळ्या माध्यमांमधून आपल्यावर आदळणाऱ्या बातम्या नकारात्मकच का असतात, हा प्रश्न पडतो. मारहाण, बदल्याची भावना, हिंसाचारी वृत्ती, फसवाफसवी अशा कुप्रवृत्तींचे दर्शन घडवणाऱ्या या बातम्यांचा ओघ आपल्याला नेमके काय दाखवून देत आहे? याचा विचार होणे गरजेचे वाटते.


स्वपातळीवर विचार करता यामागे कुठेतरी अध्यात्माची साथ सुटण्याचा हा परिणाम आहे का काय, असे वाटून जाते कारण आध्यात्म आपल्याला शांततेकडे नेते. नामस्मरणाचाही तोच प्रभाव असतो. मन:शांती नसल्यामुळे समोर येणारे धोके संतांनी, अभ्यासकांनी दाखवून दिले आहेत. त्याचबरोबर कृतज्ञतेचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञ नसाल तर सगळेच गणित बिघडते आणि अस्थैर्य निर्माण होते. यातून अहंभाव वाढतो. म्हणूनच या आनंदपर्वाची सुरुवात अहं कमी करून व्हायला हवी. आज आपल्याकडे आहे ते अनेकांकडे नाही. छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी, साध्य करण्यासाठी अनेकांची उरफोड सुरू असते. जणू त्यांचे आयुष्य पणाला लागलेले असते. म्हणूनच आपल्याकडे आहे त्याबद्दल समाधानी राहणे ही आनंद चिरंजीव करण्याची एक पायरी आहे, जी आपण या दिवाळीत गाठायला हवी. नाही त्याच्या पाठी न धावता आहे त्याचा उपभोग घ्यायला हवा, कारण भौतिकतेकडे वाहवत जाऊ तेवढी आध्यात्माची कास सुटत जाईल आणि परिस्थिती अधिक त्रासदायक होईल.


सध्या देशच नव्हे, तर अवघे जग अनेक संकटांचा सामना करत आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांना सामोरे जाताना प्रत्येकाची दमछाक होत आहे. पर्यावरणाचा ढासळता समतोल लपून राहिलेला नाही. या मागील कारणांचा विचारही व्हायला हवा आणि चुका सुधारून पुढे जाण्याचा निर्धार करायला हवा. किंबहुना, या दिवाळीचा हा संदेश आहे असेच आपण समजायला हवे. तेव्हा या दिवाळीमध्ये आपण मन:शांती शोधू या, पर्यावरणाची नाळ सोडण्याचा प्रयत्न करू या आणि स्वत:च्या सुखापलीकडचा विचार करून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याचा निश्चय करू या. फटाक्यांसाठी खर्च होणारे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीकडे वळले तर यंदाच्या दिवाळीचे खरे दिवे लागले, असे आपण म्हणू शकतो. समाजातील ‌‘नाही रे‌’ वर्गाकडे पैसे जायला लागतील तेव्हा अपेक्षित तो सामाजिक बदल घडेल. निसर्गरक्षणाच्या कामीही आपल्याला असाच पुढाकार घ्यायचा आहे. अर्थात आताची पिढी बरीच पुढे आहे. लहानगे फटाक्यांचा आग्रह सोडताना दिसत आहेत, ही नक्कीच समाधानकारक बाब म्हणावी लागेल; परंतु नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत रेंगाळणारा पाऊस, बदलते ऋतूमान, पर्यावरणाशी संबंधित अन्य धोके लक्षात घेता विविध पातळ्यांवर काम करावे लागणार असल्याचे आपण समजून घ्यायला हवे. त्यासाठी दिवाळीसारखा उत्तम मुहूर्त कोणता असेल?


दीपावलीमध्ये घरोघरी दीपोत्सव साजरा होतो. पण तो करण्यासाठी लोकांनी स्वत:च्या घरामध्येच राहावे असे सांगावेसे वाटते, कारण दिवाळीमध्ये बाहेर पडण्याचे प्रमाण सध्या कमालीचे वाढले आहे. एक उदाहरण देतो. दापोलीमध्ये हॉटेल व्यावसायिक असणाऱ्या एका स्नेह्यांनी सांगितलेली ही घटना आहे. त्यांच्याकडे दिवाळीतच नव्हे तर प्रत्येक ‌‘लाँग वीकएंड‌’ला मोठी गर्दी होते. दिवाळीत तर ती प्रचंड वाढते. हॉटेल आधीपासून आरक्षित असते. मात्र कोणत्याही नियोजनाशिवाय ऐन वेळी आल्यानंतर हॉटेलमध्ये जागा नसल्याचे सांगताच ‌‘इथे पथारी घालून दिली तरी चालेल‌’ असे पर्यटक म्हणतात. तेव्हा काय बोलायचे ते कळत नाही, असे हे माझे स्नेही सांगत होते. ही परिस्थिती आपण सगळेच पाहतो तेव्हा या लोकांना स्वत:चे घर टोचते का, हा प्रश्न विचारावासा वाटतो. खरे तर प्रत्येकाला घरामध्ये सर्वाधिक आनंद मिळायला हवा, मिळत नसेल तर तो शोधायला हवा आणि तेही जमत नसेल तर यामागचे कारण शोधायला हवे. स्वत:चे राहते घरच एंजॉय करता येत नसेल, तर उरते काय, या प्रश्नाचे उत्तर आपण शोधायला हवे. शुक्रवारी रात्रीपासून रविवारच्या रात्रीपर्यंत टोलनाक्यांवर होणारी गर्दी हे उत्तर शोधण्याची गरज प्रकर्षाने दाखवून देते. आता हे कुठे तरी थांबायला हवे आणि घराबाहेर होणारा (मद्य वा अन्य आकर्षणांच्या धुंदीमध्ये) संवाद थांबून घरात, नातलगांसवे गरजेचा असणारा प्रेमभाव वाढायला हवा. म्हणूनच यंदा स्वत:च्या घरात दिवाळी साजरी करून आपल्या शहरात, पेठेत दीपोत्सव साजरा करू या, असे सुचवावेसे वाटते.


दुर्दैवाने सध्या वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. परदेशी सुखवस्तू झालेली मुले इथे वृद्ध पालकांची सगळी सोय करतात हे खरे, पण दीपावलीमध्ये त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यांवरील दीप मात्र क्षीण झाल्यासारखे दिसतात. केवळ वृद्धाश्रमांमध्येच नव्हे, तर प्रत्येक कॉलनीमध्ये वृद्ध बसलेले दिसतात. त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांना बोलते करूनही आपण दिवाळी साजरी करू शकतो. ही भेट, संवाद भलेही पाच-दहा मिनिटांचा असेल पण ‌‘काय आजोबा, कसे आहात? आज काय केले?‌’ हा साधा प्रश्नही त्यांच्या जगण्याचा एक कोपरा उजळवून टाकणारा असेल. त्यांच्याबरोबर फराळ खाणे, दीपोत्सवासाठी त्यांना सामावून घेणे हे साधेसे उपक्रमही दिवाळीचा अर्थ बदलवून टाकण्यास पुरेसे ठरतील. परिसरातील तरुणाईने, विद्यार्थ्यांनी यात पुढाकार घेतला तर स्वत:च्या पलिकडे बघण्याचा विचार प्रबळ होईल आणि चौकटीबाहेरचे जग अनुभवताना ही दीपावली भावनिकदृष्ट्याही प्रगल्भ करुन जाईल.


एकदा विचारांच्या कक्षा रुंदावल्या, बाहेरचे जग बघण्याची आवड निर्माण झाली की रोजचा दिवस दिवाळीसारखा होऊन जाईल. आपण छोट्या-मोठ्या कृतीतून दुसऱ्याला आनंद द्यायला शिकू. दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधायला शिकू. माझ्या मते, सध्या या भावनेची समाजाला आत्यंतिक गरज आहे. आत्मकेंद्री वृत्तींच्या विळख्यातून सुटण्याचा हा एक श्रेयस्कर मार्ग आहे. इथे अलीकडे वाचनात आलेली एक गोष्ट स्मरते. एक स्त्री टोलनाक्यावर थांबलेली असते. ती टोल देते आणि मागील दहा गाड्यांचा टोलही आपल्याकडून घ्या, असे सांगते. या कृतीतून दुसऱ्याला मदत करण्याचा तिचा विचार नसतो तर स्वत:ला आनंदी करण्याचा तिने निवडलेला मार्ग असतो. आपणही असे काही करू शकतो का? अर्थातच ही भेट केवळ पैशाच्या स्वरूपात असायची गरज नाही. भेट वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते. पण यातून स्वार्थीपणाकडे वाढणारा कल एक ना एक दिवस कमी होईल असे वाटते. समाजसुधारणेचे, स्वत:ला सुधारण्याचे काम हाती घेण्यासाठी प्रत्येक वेळी मोठा उपक्रम हाती घ्यावा लागत नाही. जाता-जाता, सहजतेनेही काही गोष्टी होऊ शकतात. या दिवाळीपासून त्याचा आरंभ झाला तर सोने पे सुहागा...!


आज आपण हातातल्या दुष्ट यंत्रामध्ये हरवलो आहोत. घरात, प्रवासात, कामाचे तास वगळता फावल्या वेळेवर त्याचे अधिराज्य आहे. समोरासमोर बसलेल्या दोन व्यक्ती पूर्वी एकमेकांशी बोलत असत. माफक चौकशी करत असत. हवापाण्याच्या गप्पा करत संवाद एका वळणावर जात असे. पण आता दोघांच्याही हातात मोबाइल असतो. कानामध्ये हेडफोन असल्यामुळे एखाद्याच्या आर्त हाकाही आपल्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असते. अशा संवाद हरवलेल्या काळात दीपोत्सव साजरा करताना दोन वाक्यांची देवाणघेवाण करण्याचे औचित्य वा महत्त्व आपण ओळखायला हवे, कारण अंधार दिव्यानेच नव्हे तर आपुलकीच्या दोन शब्दांनीही दूर होऊ शकतो. तुमचे दोन शब्द एखाद्याला धीर देऊ शकतात. शेवटी दिवाळीच नव्हे, तर आपल्याकडील प्रत्येक सणच माणसाने, समाजाने एकत्र येण्याचा विचार घेऊन येतो. भाऊ, बहिणी, आत्या, मावशा, काका अशा सगळ्यांनी एकत्र येण्याचा हा महोत्सव असतो. तेव्हा यंदा आपण अशी दिवाळी साजरी करू या.

Comments
Add Comment

दिवा आणि दिवाळी...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर मी जयहिंद कॉलेजमधे शिकत असताना घडलेली ही घटना. आमच्या कॉलेजमधे दरवर्षी नवरात्रोत्सव

“एक वो भी दिवाली थी...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दिवाळीच्या आठवणी हा मोठा रम्य विषय असतो, सर्वांसाठीच! ज्यांच्यासाठी आता अनेक

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

विशेष : लता गुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटावा अशा अनेक शिल्पाकृती आहेत. यादवांच्या कारकिर्दीचा

विनोदी लेखक रमेश मंत्री

कोकण आयकॉन सतीश पाटणकर प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत

नल कुबेर व मणिग्रीव

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युगातील गोष्ट आहे. कुबेराला नल कुबेर व मणिग्रीव नावाची दोन मुले

जमीन मालकाची फसवणूक

क्राइम : अॅड. रिया करंजकर उद्योगधंदे व कामाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील तरुणाई शहराकडे ओढली जात आहे आणि