
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना दुर्दैी प्रसंगाला सामोरे जावे लागले. शनिवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी तळोदा-धडगाव रस्त्यावर चांदशैली घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून २८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये घोटाणे आणि कोरिट या दोन गावांतील तरुणांचा समावेश आहे.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने सातपुड्यातील अस्तंबा ऋषींच्या शिखरावर दर्शनासाठी गेलेल्या यात्रेकरूंचा हा प्रवास होता. दर्शन घेतल्यानंतर सकाळी ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. वाहनात तब्बल ३५ जण बसलेले होते. मात्र चांदशैली घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन थेट दरीत कोसळले. क्षणार्धात सर्वकाही संपले. वाहन दरीत कोसळताच आत बसलेल्या प्रवाशांपैकी काहीजण दाबले गेले तर काहींना जबर मार लागून जागीच मृत्यू झाला.
या अपघातात पवन गुलाब मिस्तरी (२४), बापू छगन धनगर (२४), चेतन पावबा पाटील (२३), भूषण राजेंद्र गोसावी (३०), राहुल गुलाब मिस्तरी (२२, सर्व रा. घोटाणे), तसेच हिरालाल जगन भिल (३८) आणि योगेश लक्ष्मण ठाकरे (२८, रा. कोरिट) यांचा जागीच मृत्यू झाला. गणेश संजय भिल (१३, रा. शबरी हट्टी) या अल्पवयीन मुलाचाही मृत्यू झाला. सर्व मृत हे नंदुरबार तालुक्यातील रहिवासी आहेत.
दिवाळीच्या सुट्टीत दर्शनासाठी एकत्र गेलेल्या सात मित्रांचा एकत्र मृत्यू झाल्याने दोन गावांवर शोककळा पसरली आहे. दर्शनावेळी त्यांनी काढलेले समूह फोटो आता त्यांच्या आठवणी ठरत आहेत. काही क्षणांपूर्वी हसत-खेळत घेतलेला तो फोटोच शेवटचा ठरला. या दुर्घटनेनंतर दोन्ही गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबीयांचा आक्रोश पाहून सर्वांचे डोळे पाणावले आहेत.