
महाविद्यालयावर आरोप; वंचित आघाडीचे आंदोलन
पुणे : पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाला लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील नोकरीची संधी गमवावी लागली. पुणे येथील त्याच्या पूर्वीच्या महाविद्यालयाने आवश्यक कागदपत्रे सादर करूनही त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र जातीमुळे तपासण्यास स्पष्ट नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला. हा प्रकार पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात घडला. दरम्यान, या प्रकरणी सम्यक विद्यार्थी संघटनेकडून शुक्रवारी (दि. १७) महाविद्यालयाच्या गेटजवळ आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला.
ट्विटमध्ये ते म्हणतात, ''नंदुरबारसारख्या गरीब आदिवासी जिल्ह्यातून यूकेपर्यंत शिक्षणाचा खडतर प्रवास केलेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरूणाला नोकरीसाठी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी महाविद्यालयाने जात विचारली. विशेष म्हणजे, जेव्हा प्रेम लंडनला शिक्षणासाठी गेला होता, तेव्हा याच महाविद्यालयाने हे प्रमाणपत्र तपासणी करून दिले होते. आता नोकरीसाठी पुन्हा त्याच प्रमाणपत्राची मागणी केली असता, महाविद्यालयाने नकार दिला.'' प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेल्या एका होतकरू तरुणाला केवळ त्याच्या 'जाती'मुळे नोकरी गमवावी लागली आहे. प्रेमची ही कथा केवळ त्याची एकट्याची नसून, जातीय भेदभावामुळे ज्यांच्या महत्त्वाकांक्षा चिरडल्या जातात, अशा असंख्य दलित विद्यार्थ्यांची कथा असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.
प्रेम बिऱ्हाडे म्हणाला, ''मी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत होतो. कॉलेजने मान्य केले की त्यांना लंडनमधील कंपनीकडून ई-मेल मिळाला होता. त्यावर उत्तर देताना महाविद्यालयाने सांगितले की आज तुमचे काम होणार नाही, दोन दिवसांनी डॉक्युमेंट वेरिफिकेशन करू. मी दोन दिवसांनी जेव्हा पुन्हा चौकशी केली तेव्हा लॉली दास यांनी उपप्राचार्य सरदेसाई यांच्याशी संपर्क साधायला सांगितले. सरदेसाईंनी उत्तर दिले, तू संबंधित विभागप्रमुखांशी बोल, मला फोन करू नकोस. मग मी पुन्हा लॉली दास यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी तुझी जात कोणती? असा प्रश्न विचारला. आणि एक दिवसानंतर मला उत्तर मिळाले, मुख्याध्यापिकांच्या सूचनेनुसार आम्ही तुझी शिफारस करू शकत नाही.''