
प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
काल दूध विकत घेताना मनात एक प्रश्न उभा राहिला. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे त्या प्रमाणात दूध विक्री आणि दुधापासून बनवलेले अनेक पदार्थ जसे की पनीर, दही, आईस्क्रीम, मिठाया इत्यादींची विक्रीसुद्धा वाढली आहे. अलीकडेच काही दिवसांसाठी मी गावात गेले होते. माझ्या लहानपणी या गावच्या घरातील गोठ्यात पंधरा-सोळा गाई, म्हशी आणि बैल वगैरे असायची! त्याच जागेचे नूतनीकरण करून पाहुण्यांसाठीची खोली बनवली आहे. या गाई-म्हशी घरातून केव्हा नाहीशा झाल्या कळले नाही. एकंदरीतच गावात फेरफटका मारताना फारशा गाई-म्हशी दिसल्या नाहीत. कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच छोट्या शहरात किंवा खेड्यापाड्यात जाण्याचा प्रसंग येतो; परंतु लहानपणी ज्या प्रमाणात गाई-म्हशी -शेळ्या वगैरे दिसायच्या त्या अलीकडे दिसत नाहीत. याचा अर्थ लोकसंख्या तिपटीने वाढली आणि गुरांची संख्या तिपटीने कमी झाली, असा वरचा अंदाज जरी धरला तरी इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी इतक्या कमी गुरांकडून कसा काय दूध पुरवठा होतो? जर दूधच पुरेसे नाही तर दुग्धजन्य पदार्थ कसे निर्माण होतात? मला पडलेला हा बालिश प्रश्न आहे. तज्ज्ञ मंडळी यावर अधिकारवाणीने भाष्य करू शकतील! असो.
दुधाचे मी केवळ उदाहरण दिले खरंतर आता माझ्या डोळ्यांसमोर अशा अनेक वस्तू आहेत, अन्नपदार्थ आहेत की त्याची मागणी आणि पुरवठा व्यस्त प्रमाणात आहे. आता फक्त मनात विचार हा आहे की याची कमतरता कशी काय भरून काढायची? याच विचारात असताना एक उदाहरण डोळ्यांसमोर आले.
सुहास आणि सुनीता रामेगौडा हे बंगळूरुसारख्या मोठ्या शहरात सुखवस्तू जीवन जगत असताना त्यांनी अचानक सगळे काही सोडून वेगळ्या प्रवासाला सुरुवात केली, त्यांची गोष्ट मी थोडक्यात नमूद करते. या जोडप्याने २०१७ मध्ये ठरवले की, भौतिक सुखसुविधेपेक्षा निसर्गाशी जवळीक साधणारे सरळ साधे आयुष्य जगायचे. नुसताच विचार नाही केला तर चक्क त्यांनी निलगिरी पर्वतरांगात स्थलांतरही केले. दगड-मातीने बांधलेल्या छोट्याशा घरात ते महिन्याला दहा हजार रुपयांपेक्षाही कमी खर्चात आरामात आणि आनंदात राहू लागले. तिथे राहून त्यांना जाणवले की आजूबाजूच्या ग्रामीण व आदिवासी महिलांकडे रोजगार नाही. कायमस्वरूपी उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही त्यामुळे त्यांचे जीवन कठीण झालेले आहे. या महिलांना सक्षम करण्यासाठी दोघांनी पावले उचलली. या निमित्ताने समाजासाठी काहीतरी सकारात्मकतेने करण्याचे योजले.
२०१९ मध्ये त्यांनी ‘इंडियन यार्ड्स फाऊंडेशन’ची स्थापना केली. सुरुवातीला जुन्या कापडांच्या जोडापासून या महिलांना सोबत घेऊन गोधड्या किंवा रजाई तयार करून विकायला सुरुवात झाली. कोविडसारख्या भयावहकाळात त्यांनी मास्क तयार करून घेतले. त्यामुळे महिलांकडे त्या काळातही पैशाचा ओघ चालू राहिला. त्यानंतर काही घरगुती उपयोगाच्या किंवा शोच्या वस्तू तयार करून घेतल्या; परंतु खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली ती २०२३ मध्ये सुरू केलेल्या ‘द गुड डॉल’ या ब्रँडमुळे!
या ब्रँडअंतर्गत जुन्या वाया गेलेल्या कापडांपासून बनवलेल्या आतापर्यंत १२,००० किलो कापड वाया जाण्यापासून त्यांनी वाचवले. त्या विविधरंगी कापडांपासून बाहुल्या बनवल्या. उत्तम रंगसंगती आणि लहानसहान गोष्टीत लक्ष घालून त्या मुलांना कशा आवडतील अशा तऱ्हेने त्याची निर्मिती केली. या बाहुल्यांचे हातपाय वळू शकतात, त्यांचे कपडे बदलता येतात वगैरे.
या उपक्रमामुळे निलगिरी भागातील जवळपास ९५ हून अधिक महिलांना रोजगार मिळालेला आहे. पूर्वी महिन्याला केवळ दोन-तीन हजार रुपये कमावणाऱ्या या महिला आता जवळजवळ आठ हजार ते सतरा हजार रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न मिळवतात. साहजिकच या महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांच्या घरातील आर्थिक प्रश्न सुटलेला आहे. २०२३-२४ मध्ये या बाहुल्यांच्या निर्मितीमुळे तब्बल ७५ लाख रुपयांची बाजारात उलाढाल झाली. आता २०२४-२५ या वर्षात दोन कोटींचं लक्ष्य ठेवले आहे, ही किती कौतुकास्पद गोष्ट आहे!
कोणत्याही टाकाऊ वस्तूंपासून काही टिकाऊ तर कधी पर्यावरणपूरक वस्तू तयार करता येऊ शकतात. या जोडप्याचे उदाहरण घेऊन आपण काही सर्जनशील लोकोपयोगी आणि सामान्यांना परवडेल अशा वस्तू निर्माण करू शकलो तर ती आजच्या काळात फार महत्त्वाची गोष्ट ठरू शकते!
एकंदरीत काय तर कोणत्याही वस्तूचा पुनर्वापर कसा करता येईल याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या लेखाच्या निमित्ताने माझ्या जुन्या एका कवितेच्या ओळी मला आठवत आहेत. पेटिकोट फाटला तर त्याची पिशवी करता येईल पिशवी फाटली तर त्याचे पायपुसणे करता येईल! शेवटी कविता म्हणजे तरी काय? आपले जगणे आपण त्यातून उतरवत असतो. पूर्वी आपले जगणे असेच होते. आता ‘वापरा आणि फेका’ (यूज अॅण्ड थ्रो)चा जमाना आला आहे. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग, वापरा आणि फेकून देण्याऐवजी वेगळ्या वस्तूत रूपांतरित करून परत परत वापरा! अशा वृत्तीमुळे कदाचित पृथ्वीवरील कचऱ्याचे प्रमाण कमी होईल आणि आपल्यालाही कोणत्याही वस्तूची कमतरता भासणार नाही! pratibha.saraph@ gmail.com