Sunday, October 19, 2025
Happy Diwali

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी; प्रवाशांचा संताप

रायगड: शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे आज (१९ ऑक्टोबर) दिवाळीच्या तिसऱ्या दिवशीही मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एग्झिटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत आहे.

१७ आणि १८ ऑक्टोबरलाही दिवसभर या भागात वाहनांचा मोठा ताण होता. आज तर खोपोली एग्झिटपासून खंडाळा घाटापर्यंत वाहनांची सुमारे तीन ते चार किलोमीटर लांब रांग लागल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासूनच वाहनांची वाढलेली संख्या आणि काही चालकांकडून लेन शिस्त न पाळल्याने एक्सप्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ओव्हरटेकची स्पर्धा आणि वेगमर्यादा न पाळल्यानेही वाहतूक कोंडी अधिक वाढली आहे.

खंडाळा महामार्ग वाहतूक पोलीस सतत ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांचा ओघ एवढा मोठा असल्याने कोंडी कमी होताना दिसत नाही. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना तासन् तास वाहनांमध्ये अडकून राहावे लागत आहे.

प्रवाशांचा संताप...

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा संताप उफाळून आला असून, सणासुदीच्या काळात प्रशासनाने आधीच योग्य नियोजन का केलं नाही? असा सवाल नागरिक करत आहेत. दिवसा मोठ्या वाहनांना बंदी असतानाही अनेक जड वाहनं एक्सप्रेस वेवर धावत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, वाहनचालक, पर्यटक आणि प्रवासी या सर्वांनाच दिवाळीच्या उंबरठ्यावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा