
लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
धर्म म्हटले की आपल्याला देव, मंदिरे, पूजा यांची आठवण येते. पण खरा धर्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे होय. आई-वडिलांचा धर्म म्हणजे आपल्या लेकरांचे संगोपन करणे, शिक्षकांचा धर्म म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान देणे, शेतकऱ्यांचा धर्म म्हणजे अन्न उत्पादन करणे, तर विद्यार्थ्यांचा धर्म म्हणजे अभ्यास करून चांगला माणूस बनणे. प्रत्येकाने आपले काम मनापासून, प्रामाणिकपणे केले तर तोच सर्वश्रेष्ठ धर्म ठरतो.
भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. “स्वधर्मे निधनं श्रेयः”, म्हणजे स्वतःचे कर्तव्य पार पाडणे हेच श्रेष्ठ आहे. जो मनुष्य आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडतो, तोच खऱ्या अर्थाने धार्मिक असतो. म्हणूनच, धर्म म्हणजे केवळ देवपूजा नव्हे; धर्म म्हणजे सत्य, प्रामाणिकता आणि कर्तव्यपालन. ज्याने आपले कर्तव्य ओळखले, त्यानेच खरा धर्म जाणला.
स्वामी विवेकानंद एक गोष्ट सांगत. एक राक्षस एका नगरीतील लोकांना खूप त्रास देत असे. अनेकांना खाऊन टाकत असे. त्या नगरीच्या राजपुत्राने त्या राक्षसाचा वध करण्याचा निश्चय केला. अनेक शस्त्र वापरूनही त्या राक्षसावर काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा एका साधूने त्या राजपुत्राला सांगितले की,राक्षसाचे मरण समुद्रापलीकडील टेकडीवर एका पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटात आहे. तू त्या पोपटाला ठार कर. पोपट ठार झाला की राक्षसही मरेल.
राजपुत्राने परिश्रमपूर्वक समुद्र ओलांडला. पोपटाच्या पिंजऱ्याचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांना ठार केले. पिंजरा ताब्यात घेतला. राजपुत्राने घेतलेल्या त्या पिंजऱ्याला गोल फिरवायला सुरुवात करताच राक्षस जमिनीवर गडाबडा लोळू लागला. त्याने समुद्रातल्या पाण्यात पिंजरा बुडवला. त्यासोबत राक्षस मरण पावला. गोष्ट सांगून झाल्यावर स्वामीजी म्हणाले. “धर्म हा भारताचा प्राण आहे.”
भारतात कोणतीही सुधारणा करताना तुम्हाला धर्माला धक्का लावून चालणार नाही. आपल्या देशात वेळोवेळी जे संत जन्माला येतात तेच धर्मरक्षणासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी.
भारतामध्ये हजारो राजे निर्माण झाले. आपण कोणत्याही राजाची जयंती साजरी करीत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांची मात्र जयंती साजरी करतो. याचे कारण शिवाजी महाराजांनी धर्मसंस्थापनाचे महान कार्य केले. त्या काळात मठ आणि मंदिर यांची मोडतोड होत होती. शिवाजी महाराजांनी मठा - मंदिरांना संरक्षण दिले.त्याचबरोबर चर्च आणि मशिदी यानाही संरक्षण दिले.वेगवेगळ्या साधुसंन्याशाना सन्मानपूर्वक आपल्या राज्यात आश्रय दिला. आपण सर्वांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. प्रामाणिकपणे कार्य करणे हेच खरे धर्म आहे. स्वामीजी म्हणतात. “आपला धर्म पाळा, आपल्या देशाच्या संस्कृतीचा अभिमान बाळगा.”
आपल्या भारत देशात ३५ कोटी देव आहेत. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे. सूर्यदेव उष्णता देतात, वायुदेव वायू देतात, इंद्रदेव पर्जन्य देतात, अशा प्रकारे प्रत्येक देव आपले कर्तव्य करीत असतो. त्यामुळेच आपला देश आजही टिकून आहे.
आपणही आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणे हेच धर्म आहे. धर्म हा कोणाच्याही अधीन नाही. प्रत्येकाचे आपापले कर्तव्य हेच धर्म आहे. शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्कार द्यायचे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आदर करायचा. हा शालेय धर्म आहे. आई-वडिलांचा धर्म म्हणजे आपल्या लेकरांना चांगले संस्कार देणे. मुलांनी आई-वडिलांचे ऐकणे हा त्यांचा धर्म आहे.
आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास आपोआप धर्मपालन होते आणि भगवंताने आपल्याला जे शरीर, बुद्धी आणि श्रमशक्ती दिले आहे त्याचे सतत स्मरण ठेवून आपण आपले जीवन संपन्न करावे, हाच खरा धर्म आहे. विद्यार्थी म्हणून आपली जी कर्तव्ये आहेत, ती आपण योग्यरीतीने पार पाडली पाहिजेत. “आपले कर्तव्य हेच आपले सर्वात मोठे धर्म आहे.”