
बदलापूर : बदलापुरातील आदर्श विद्यामंदिर शाळेबाहेरील पदपथावर एक सर्प नागरिकांना निदर्शनास आल्यावर 'स्केल्स अँड टेल्स कॉन्सर्वेशन' संस्थेचे सर्पमित्र विकास आढाव व रतेश कारेकर यांनी त्याला वनविभाग बदलापूर येथील वनाधिकारी वैभव वाळिंबे यांच्या ताब्यात दिले. सदर साप हा मलबार चापडा (मलबार पिट वायपर) प्रजातीचा अत्यंत दुर्मीळ विषारी साप असल्याचे त्यांचे लक्षात आले. या प्रजातीच्या सापांचे वास्तव्य महाराष्ट्रात फक्त आंबोली घाट परिसरात उंच डोंगरावर थंड हवेच्या ठिकाणी असते. हा साप बदलापूरात कसा आला याबाबत वनाधिकाऱ्यांनी तपास करून हा दुर्मिळ साप ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणी गोवा, सिंधुदुर्ग या ठिकाणाहून येणाऱ्या टूर्स आणि ट्रॅव्हल बसचा थांबा असल्याने हा साप सदर वाहनासोबत आल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी वर्तविला असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
अत्यंत दुर्मिळ व वेगळ्या रंगाच्या ह्या सर्पास सर्पमित्र व वनविभाग यांच्या मदतीने वाचवण्यात यश आलेले असून उप वनसंरक्षक ठाणे सचिन रेपाळ यांच्या आदेशाने व सहायक वनसंरक्षक भाग्यश्री पोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सर्पास त्याच्या मूळ अधिवास असलेल्या आंबोली घाट परिसरात वनाधिकारी व सर्पमित्र यांच्या मदतीने आज सुखरूप सोडण्यात आले. 'स्केल्स अँड टेल्स कॉन्सर्वेशन'चे सर्पमित्र संकेत कर्णिक व वनरक्षक दिपक बेनके यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी कौतुक करून साप अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असल्याने मारू नका असे आवाहनही केले.
मलबार चापडा हा विषारी प्रजातीचा विशिष्ट हवामानात आढळणारा आकर्षक रंगसंगतीचा २ ते ३ फूट लांबीचा दुर्मिळ साप असून तो निशाचर आहे, ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळल्याची नोंद असून महाराष्ट्रामध्ये आंबोली घाटामध्ये उंच माथ्यावर दाट जंगलात हा साप जास्त संख्येने आढळून येतो. - वैभव वाळिंबे, वनपरिमंडळ अधिकारी अंबरनाथ.