नल कुबेर व मणिग्रीव

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


द्वापार युगातील गोष्ट आहे. कुबेराला नल कुबेर व मणिग्रीव नावाची दोन मुले होती. पित्याच्या अमाप संपत्तीमुळे ती अतिशय गर्विष्ठ झाली होती. एके दिवशी ते मंदाकिनी नदीच्या तीरावर वारुणी मदिरा प्राशन करून नशेने धूत झाले होते. सोबत अप्सराही गाणे बजावणे करीत होत्या. त्याच वेळी देवर्षी नारद तेथून जात होते. नारदांना पाहून अप्सरांनी आपल्या शरीराभोवती वस्त्रे गुंडाळली व नम्रपणे उभ्या राहिल्या. नलकुबेर व मणीग्रीव मात्र नशेमध्ये मदोन्मत झाल्याने नल कुबेर व मणिग्रीव यांना त्याचे भान नव्हते. त्यामुळे त्यांनी नारदाकडे दुर्लक्ष करून उपहास केला.


देवर्षी नारद यांना त्यांच्या या कृतीचा राग आला व त्यांनी दोघांनाही भूतलावर गोकुळात नंदाचे घरासमोर वृक्ष होऊन पडण्याचा शाप दिला. त्याप्रमाणे ते दोघेही नंदाच्या घरासमोर अर्जुन वृक्ष होऊन यमलार्जुन नावाने ओळखले जाऊ लागले. मुलांची ही अवस्था पाहून कुबेराला अत्यंत वाईट वाटले. त्याने मुलांच्या वर्तणुकीबाबत नारदांची क्षमायाचना केली. तेव्हा नारदाने द्वापार युगातच जेव्हा कृष्णावतार होईल त्यावेळेस भगवान कृष्णांच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार होईल असा उ:शाप दिला.


कालांतराने मथुरेचा राजा कंस याच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या जनतेला तसेच कंसाने कैदेत टाकलेल्या आपलीच बहीण देवकी व जावई वासुदेव यांना त्रासातून मुक्त करण्यासाठी कारागृहातच प्रत्यक्ष भगवंताने देवकीच्या पोटी जन्म घेतला. वासुदेवांनी मध्यरात्रीच भर पावसात बालकृष्णाला गोकुळात नंदाकडे नेऊन ठेवले. यशोदेने कृष्णाचे संगोपन वात्सल्याने केले. कृष्णाने बालपणापासूनच आपल्या लीलांद्वारे गोकुळवासीयांना लळा लावला व त्यांची मने आकर्षित केली. लोणी चोरणे, छकडा मोडणे, त्रृणावर्ताचा वध, पूतना वध, यशोदेला मुखातून ब्रह्मांड दर्शन करविणे अशा नंद येशोदेला तसेच गोकुळातील गोपगोपिकांना विस्मयकारक वाटतील अशा अनेक लीला केल्या.


एक दिवस कृष्णाने मटके फोडून लोणी खाल्ल्याने यशोदेला राग आला, व तिने बालकृष्णाला दोरीने बांधून दोरी उखळाला बांधून ठेवली. तेव्हा कृष्ण रांगू लागले व रांगत रांगत अंगणात आले. तसेच नारदाचे म्हणणे सत्य करण्यासाठी ते तसेच रांगत जाऊन त्या दोन वृक्षांच्या मधून जाऊ लागले. कृष्ण दोन झाडांमधून निघाले; परंतु उखळ त्या दोन झाडांमध्ये अडकले. थोडे ओडताच व प्रत्यक्ष भगवंताचा धक्का लागताच दोन्ही झाडे मोठा कडकडाट करीत जमिनीवर कोसळली. त्यातून दोन सुंदर पुरुष म्हणजे नल कुबेर व मणिग्रीव्ह बाहेर पडून कृष्णासमोर हात जोडून उभे राहिले व भगवंताची स्तुती करू लागले. नारदाच्या अनुग्रहामुळे आपले दर्शन झाले आता आम्हाला जाण्याची अनुमती द्यावी, असे म्हणून परवानगी मागू लागले.


तेव्हा भगवंताने,“तुम्ही मदाने आंधळे झाले होते, व देवर्षी नारदांनी तुम्हाला शाप देऊन तुमचा गर्व जाण्यास मदत केली. ही तुमच्यावर कृपाच होती. आता तुम्ही माझे चिंतन करीत आपापल्या निवासस्थानी जा. संसार चक्रातून सोडविणाऱ्या अनन्य भक्तीची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे,” असे सांगून त्यांना परवानगी दिली. यावर दोघांनीही उखळाला बांधलेल्या देवाला प्रदक्षिणा घालून व त्याची आज्ञा घेऊन ते उत्तर दिशेला निघून गेले. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने नल कुबेर व मणिग्रीव यांचा उद्धार केला.

Comments
Add Comment

येता आनंदा उधाण...

प्रासंगिक : अजय पुरकर दीपावलीच्या शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. सध्या जगण्याचे आयाम बदलले आहेत. माणूस

दिवा आणि दिवाळी...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर मी जयहिंद कॉलेजमधे शिकत असताना घडलेली ही घटना. आमच्या कॉलेजमधे दरवर्षी नवरात्रोत्सव

“एक वो भी दिवाली थी...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दिवाळीच्या आठवणी हा मोठा रम्य विषय असतो, सर्वांसाठीच! ज्यांच्यासाठी आता अनेक

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

विशेष : लता गुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटावा अशा अनेक शिल्पाकृती आहेत. यादवांच्या कारकिर्दीचा

विनोदी लेखक रमेश मंत्री

कोकण आयकॉन सतीश पाटणकर प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत

जमीन मालकाची फसवणूक

क्राइम : अॅड. रिया करंजकर उद्योगधंदे व कामाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील तरुणाई शहराकडे ओढली जात आहे आणि