
सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये एका बर्थडे पार्टीत पोलिसांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून दारूच्या साठ्यासह काही तरुणांना मद्यपान करताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात शहरातील प्रसिद्ध व्यापारी समीर शाह आणि आणखी एक व्यक्ती अटकेत आहेत.
गुजरातच्या अलथान परिसरातील केएस अवतार हॉटेलमध्ये समीर शाह याने त्याच्या वाढदिवसानिमित्त मोठी पार्टी आयोजित केली होती. पार्टीदरम्यान, समीर शाहचा १९ वर्षांचा मुलगा परिस आणि त्याचे काही मित्र हॉटेलजवळ पार्क केलेल्या गाडीत दारू पित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस त्वरित घटनास्थळी पोहचले.
पोलिसांनी या तरुणांचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला असता परिस आक्रमक झाला आणि पोलिसांशी झटापट करू लागला. त्याने पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या गोंधळादरम्यान परिसचे वडील समीर शाह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांशी बोलताना "माझी वरच्या अधिकाऱ्यांशी ओळख" असल्याचा उल्लेख करत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, दोन महिला घटनास्थळी आल्या आणि परिसला "लहान मुलगा आहे" म्हणून सोडण्याची विनंती करत होत्या.
पोलिसांनी वाहनाची तपासणी करताना ९ दारूचे कॅन, ७ मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली. तसेच, शिकाऊ चालकाचा "L" स्टिकर असलेली गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना झोन ४ च्या पोलिस उपायुक्त निधी ठाकूर यांनी सांगितले: "दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, एक दारू जप्ती प्रकरण आणि दुसरा पोलिसांवर हल्ला. दारू पुरवणाऱ्या डिलिव्हरी मॅनला अटक करण्यात आली असून, त्याने समीर शाह यांच्या सूचनेवरून दारू आणल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे समीर शाहलाही अटक करण्यात आली आहे."
पुढे त्या म्हणाल्या, "परिसच्या श्वास चाचणीत (ब्रेथ एनालायझर) त्याने दारू पिल्याचे निष्पन्न झाले. त्याचे रक्त व लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नोटीस पाठवायची की अटक करायची, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल."
@6536973795366 pls check