
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
दिवाळीच्या आठवणी हा मोठा रम्य विषय असतो, सर्वांसाठीच! ज्यांच्यासाठी आता अनेक दिवाळी किंवा नाताळ किंवा ईद शिल्लक नाहीत ते तर या सणांच्या लहानपणीच्या निरागस किंवा तारुण्यातील रोमँटिक आठवणींत रममाण होत असतात. ज्यांना आयुष्यात अजून काहीतरी मिळवायचे आहे, मिळवण्याची संधी आहे ते नवी स्वप्ने रंगवतात ती सुद्धा या सणांच्या अवतीभवतीच. म्हणजे ‘या दिवाळीला नवी गाडी घेऊ, स्कुटी घेऊ, टीव्ही घेऊ किंवा नव्या फ्लॅटमध्ये राहायला जावू.
हे सगळे अलीकडे, म्हणजे गेल्या २५/३० वर्षांत सुरू झाले. पूर्वी सगळ्या गोष्टींचा इतका सुकाळ झालेला नव्हता. उत्पन्न मर्यादित, त्यामुळे स्वप्ने मर्यादित, खरे सांगायचे तर हाव मर्यादित, त्यामुळे अगदी थोडक्यात गंमत. प्रत्येक घरात कसली ना कसली तरी कमतरता असे; परंतु त्या कमतरतेतही एक समाधान सुखाने नांदत होते. बहुतेकांचे एकंदर जीवनच साधेसरळ होते. कदाचित त्यामुळेच मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अपूर्वाई वाटायची. छोट्याछोट्या गोष्टीही मोठा आनंद देत. अनावश्यक विपुलतेचा शाप तेव्हा जगावर पडलेला नव्हता.
त्याकाळी दिवाळीत मिळणारा शाळेचाच एक गणवेश किती आनंद द्यायचा? मुलाना खाकी चड्डी आणि पांढरा सदरा तर मुलीना निळाभोर स्कर्ट आणि पांढरेशुभ्र ब्लाउज. बस्स इतकेच! मग तो शिवायला टाकल्यावर शिंप्याकडे आमच्या चकरा सुरू होत. त्यांची उत्तरेही माहीत होती, “कापड कापले आहे, उद्या शिवून होईल” किंवा “सगळे झाले, आता फक्त काजे-बटन राहिलेत उद्या या.” बिचारी आम्ही मुले रडवा चेहरा करून घरी परतत असू.
दिवाळीत महिनाभराची सुट्टी मिळणार म्हणून मोठा आनंद वाटायचा. शाळेत दिवाळीच्या सुट्टीची नोटीस आली की आम्ही प्रचंड खूश व्हायचो. पण आमचे शिक्षक मोठ्या सुट्टीचा तो आनंद मुलांना निर्भेळपणे भोगता येऊ नये म्हणून भरपूर गृहपाठ देऊन ठेवत. मग वर्गातली हुशार मुले सुट्टीच्या पहिल्या काही दिवसातच ते पूर्ण करत. आम्हीही मग शिक्षकांना तेच गृहपाठ ‘जरा वेगळ्या हस्ताक्षरात वाचायचा आनंद देण्यासाठी’ हुशार मित्रांचे ते ‘अक्षर साहित्य’ आमच्या अक्षरात उतरवून काढत असू!
एकदाचे गृहपाठाचे काम संपले की अंगणात करायच्या किल्ल्याची तयारी सुरू! जवळच्या शेतातून दोन-तीन बादल्या माती आणली जाई. मग काही चतुर आया मुलांना किल्ला बांधतानाच त्यात अंगचे भुयार कसे ठेवावे ते सांगत. एक-दोन दिवसांत सुपीक मातीचा किल्ला उभा राही. त्याला खालपासून वरपर्यंत चिमुकल्या पायऱ्या असत. मूल कल्पक असेल तर या पायऱ्या वळणावळणाची वाट फिरवत वर चढत जायच्या. नाहीतर शत्रूचे काम अगदी सोपे - सरळ १०/२० पायऱ्या चढल्या की किल्ला सर!!
किल्ल्याच्या रक्षणासाठी आणलेले आमचे मातीचे सैनिक काही केल्या पायऱ्यांवर नीट मावायचे नाहीत. मग आम्ही त्यांना हिरकणीसारखे मध्येच कुठेतरी खड्डा करून उभे करून टाकायचो! सैनिकच ते, विनातक्रार किल्लेदाराचे ऐकायचे आणि आपापली तलवार घेऊन उभे राहत!
अनेकदा दिवाळी सुरू झाल्यावर किल्यांवर किर्र अंधार असल्याचे आमच्या लक्षात येई. मग काय, किल्ल्याची प्रकाशव्यवस्थाही बघावी लागे. त्यासाठी पुन्हा किल्ल्याला आडमाप ठरणाऱ्या पणत्या कुठे बसवायचा हा प्रश्न! त्यांनाही किल्ल्याच्या मूळ आराखड्यात ऐनवेळी मोठे बदल करून आम्हाला सैनिकांसारखेच कुठेतरी अॅडजस्ट करावे लागे.
किल्ला पश्चिम महाराष्ट्रातल्या चांगल्या हिरव्यागार परिसरातला वाटावा म्हणून आम्ही त्यावर तात्पुरती मोहरीची लागवड करायचो. एक-दोन दिवसांत किल्ल्यावर चांगली हिरवळ दिसू लागे. त्यात एखाद दुसरा मातीचा, कायम झेप घ्यायच्या पोजमध्येच पण प्रत्यक्षात मात्र झोप लागलेला वाघही कुठेतरी ठेवून आम्ही किल्ल्याची जैविक विविधता आणि वन्य जीवनाचे संवर्धन साधायचो. गृहपाठाचा पहिला अध्याय आणि किल्ले-बांधणीप्रकल्प संपल्यावर आमचे टार्गेट असे स्वत:चा आकाशकंदील तयार करणे.
बांबू आणून तो दोन तीन दिवस पाण्यात भिजवणे. त्याच्या छोट्या छोट्या काड्या चिरून षटकोनी पारंपरिक आकाशदिवा तयार करणे हाही एक प्रकल्पच होऊन बसायचा. कारण या प्रक्रियेत एखाद्या भावंडाच्या बोटात कुसळ घुसणे, त्यात पाणी होणे, त्यावर पट्टी बांधणे, त्याची रडापड हे सगळे समविष्ट असायचे. शेवटी घरीच खळ तयार करणे, दुकानातून खास आकाशदिव्यासाठीच जन्माला आलेले सुंदर रंगाचे कागद आणणे, त्याचे आधी अपुऱ्या आकाराचे चौकोन कापून चुकल्यावर, पुन्हा गुपचूप कागद आणून मोठे चौकोन कापून डकवणे. लांबलचक शेपट्या किंवा झिरमळ्या लावून आकाशदिवा सजवणे आणि शेवटी त्यात दिवा लागल्यावर दूर जावून आपणच आपला आकाशदिवा किती सुंदर दिसतोय ते पाहणे हा एक वेगळाच आनंद असायचा.
त्याकाळी फटाके उडवणे हे आजच्यासारखे बदनाम झालेले काम नव्हते. त्यात मोठी मौज होती. मोठ्या लोकांनी तिथेही बरेच भेदाभेद निर्माण करून ठेवले होते. छोट्या मुलींनी फक्त फुलबाज्या उडवायच्या, छोटे असून स्वत:ला मोठे समजणाऱ्यांनी फुटक फुटक करत एकेक लवंगी फटाका उडवत बसायचे, अजून थोड्या मोठ्यांनी अॅटमबाँब उडवावेत आणि या सर्वाचे स्पॉन्सर्स असलेल्या मोठ्या माणसांनी मात्र फटाक्यांच्या मोठमोठ्या लडी लावून अंगणात फेकायच्या अशी अन्यायकारक विभागणीसुद्धा आम्ही कित्येक वर्ष सहन केली.
त्यात पुन्हा शेजारच्या मोठ्या मुली छान छान कपडे घालून रांगोळ्या काढत बसल्या असल्या तर आमचा एखादा चिनी फटाका सुसू आवाज करत आमची पणतीच विझवून मोकळा व्हायचा. मग दुसऱ्या पणतीने आम्ही विझलेली पणतीची वात ‘संत ज्ञानेश्वर’ सिनेमातल्या ‘ज्योतसे ज्योत जलाते चलो’ या ओळीप्रमाणे पेटवत असू तेव्हा रांगोळी काढणाऱ्या मुलींच्या जवळ उभी असलेली मोठी मुले त्याच गाण्याची ‘प्रेमकी गंगा बहाते चलो’ ही पुढची ओळ अनुभवण्याचा प्रयत्न करत असायची. काहींच्या प्रेमकथांची सुरुवातच दिवाळीत व्हायची आणि त्या वार्षिक परीक्षेपर्यंत बहराला येत व परीक्षेच्या निकालानंतर संपत.
त्याकाळी पडणारी दिवाळीतली विक्रमी थंडी अजूनही अनेकांना आठवते. नरकचतुर्दशीला अांघोळीच्या वेळी दात कडकड वाजायचे. बोलताना तोंडातून वाफ निघायची. पण गेले ते दिवस. सगळेच बदलले. दिवाळी आणि आपणही! एस. कृष्णमूर्ती आणि टी. वरदराजन यांच्या १९६१ सालच्या ‘नजराणा’मध्ये एक गाणे होते ते जुने गाणे मात्र या दिवसात वारंवार आठवत राहते. “एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली हैं, उजडा हुवा गुलशन हैं, रोता हुवा माली हैं.”