Saturday, October 18, 2025
Happy Diwali

श्रीमंतांची दिवाळी, गरिबाचं दिवाळं!

श्रीमंतांची दिवाळी, गरिबाचं दिवाळं!

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

परवा रस्त्याच्या कडेला एक आठ नऊ वर्षाची मुलगी मोगऱ्याचे गजरे विकत होती. शाळेचा पत्ता नाही, धड नाव पत्ताही सांगता येत नाही पण परिस्थिती कशी शिकवते माणसाला. पुढे गेल्यावर एक छोटा मुलगा सात आठ वर्षाचा पणत्या विकत होता. खपाटीला गेलेलं पोट दोन वेळचं खायलाही त्याला मिळत नसेल, कष्ट मात्र पाचवीला पूजलेले. पूर्वी एकाच्या पगारामध्ये सगळे आनंदी असायचे. गावाशिवापर्यंत दिवाळी पोहोचायची. आनंदाने सगळे सण साजरे व्हायचे. पण आता मात्र प्रश्नचिन्हच आहे. ती राहिली आठवणीतील दिवाळी. खरंतर हा दिव्यांचा सण. दीप ,पावित्र्य, मांगल्य, प्रकाशाचा, उत्साहाचा, आनंदाचा समृद्धीचा सण. पण ही समृद्धी सुबत्ता बरकत आता उरली आहे का? हा आनंद आणि प्रकाश जीवनात साजरा करण्यासाठी सर्व गोष्टी अनुकूल असायला हव्यात! परवा ट्रेनमध्ये सत्तर वर्षांच्या मावशी फराळ विकताना पाहिल्या. दोन्ही मुलं लग्न होऊन वेगळी गेली.. आई मात्र तिथेच! फार हृदयाला लागलं!

यावर्षी जून पासून पावसाने हाईटच केली. ऑक्टोबर आला तरी उजाडायचं नाव नाही. शेतकऱ्याच्या बळीराजाच्या घरी पूर आलेला आहे अश्रूंचा आणि पावसाचाही. तिथे एक हात मदतीचा असायला हवा. पण असे होते का?... नाही. आपलीच माणसं, समाज जनता स्वार्थी झालेली आहे. स्वतःचाच विचार करणं थांबवा आणि त्या पूर्ण स्थळी काहीतरी भेटवस्तू द्या जेणेकरून माणुसकीचं बांधिलकीचं एक सत्कार्य होऊ द्या. वृद्धाश्रमामध्ये अनेक वर्ष स्वकष्टानं जगणारी माणसं आता परावलंबी झाली आहे. शरीर आणि मनाने देखील त्यांच्या मनात एखादा दिवा लावता आला तर बघा. एखाद्या निराधार आश्रमास भेट द्या. ज्यांना आई-वडील नाहीत त्यांच्यासाठी ही दिवाळी खास करा. स्पेशल आपलं काहीतरी देऊन. ५ वर्ष तर कोरोनाच्या महामारीमुळे भयाण संकटाच्या पार्श्वभूमीवर माणूस पिचून, खचून गेलाय. चिंता, हाल, अरिष्ट, बेकारी, महागाई, ओला दुष्काळ, पूर, युद्ध ,भूकंप, राजकीय अस्थिरता यामुळे होत्याचे नव्हते झाले. धंदे बसले . रुपयाची घसरण, रोगराई वाढल्या, पैसा आटला, कोलमडलेले बजेट त्यात अस्मानी, सुलतानी संकटाबरोबरच राजकारण देखील परिणाम करू लागले. या धक्क्यामुळे माणूस पुरता कोलमडला. दिवाळी सणानिमित्त दिवाळं निघालं.

पूर्वीच्याकाळी चार-पाच मुले असतानाही आई-वडील सणसंस्कृती सांभाळत होते. पण आता एक दोन अपत्य असूनही लोकांची पुरती वाट लागलेली आहे. हे हाल किंवा दुर्दशा अत्यंत वाईट आहे. प्रतिकूल परिस्थितीतून उद्भवलेली समाज अस्थिरता, मानवी असंतोषाची, दारिद्र्यरेषेची वेळ आहे. वादळ, अवेळी पाऊस, ओला दुष्काळ, पिकांची नासाडी, विकासापेक्षा सत्तेवर अन लोकशाहीपेक्षा हुकूमशाहीवर गोरगरीब जनतेला वेटीस धरले जाते. ३००चा सिलेंडर १२०० ला गेला. खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल यांची भाववाढ. अन्नधान्य दूध या पदार्थांची भाववाढ. या सर्वांसह लागलेल्या जीएसटी कर यांनी गोरगरिबांची कंबर मोडली. कसलेली शेती सुद्धा पावसाने नेली. दिवाळी कशी साजरी करणार? दिवाळी तर दूरच पण दोन वेळच्या अन्नालाही माणूस मुकला आहे. याचा परिणाम उपासमार, व्यसनांधता, बेरोजगारी, गुन्हेगारी, महामारी बळवली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे कांदा, सोयाबीन, भात, गहू, मका सगळी पिके वाहून गेली. हातात पैसा नाही. कशाला म्हणून पैसा लागत नाही. पैशाशिवाय सर्वच अशक्य. कोणतीही यंत्रणा पैशाशिवाय हलते का? माणसाचे जीवन मुश्किल केले आहे. आरक्षण शिकू देत नाही, पाऊस पिकू देत नाही. मग काय दिवाळं निघालंच आहे. प्रेताच्या सामानाला सोडून सगळ्यावर जीएसटी लागली आहे. हेच खरे... यामुळे काय झाले आहे समाजाची मानसिक, शारीरिक ,आर्थिक दुर्दशा झाली हेच खरे. आधीच निघालय दिवाळं! त्यात काय साजरी करणार दिवाळी?

Comments
Add Comment