
संवाद : गुरुनाथ तेंडुलकर
मी जयहिंद कॉलेजमधे शिकत असताना घडलेली ही घटना. आमच्या कॉलेजमधे दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जायचा. एका वर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर काही मुलं आपापसात कुजबुजत होती.
‘सभागृहात इतके दिवे, इतक्या ट्युबलाईटस् असताना आणखी स्टेजवर ही समई लावण्याची गरजच काय? किती तेल वाया जातं? या सगळ्या जुन्या प्रथा आपण आधुनिक विचारांच्या मुलांनी मोडीत काढायला हव्यात वगैरे वगैरे...’
त्या मुलांची ही कुजबुज त्यावेळचे आमच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख कुलकर्णी सरांच्या कानावर गेली. दोन दिवस गेले आणि सरांनी नोटीसबोर्डवर एक नोटीस लावली. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी गेलेले बल्ब, ट्युबलाईटस् असतील त्यांनी कृपया कॉलेजच्या स्टोअररूममध्ये आणून द्याव्यात. आपल्याला एक महत्त्वाचा प्रयोग करायचा आहे.
दोन दिवसांतच मुलांनी बाद झालेल्या पाच पन्नास ट्यूबलाईटस् आणि शे-दीडशे बल्ब जमा केले. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणखी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळीदेखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. आधुनिक विचारांच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांच्या कंपूंच्या कपाळावर नेहमीप्रमाणे आठ्या उमटल्या होत्या.
त्यावेळी कुलकर्णी सर भाषणात म्हणाले की ‘इथे डावीकडे काही गेलेल्या ट्युबलाईटस् आणि बल्ब ठेवलेले आहेत आणि उजव्या बाजूला काही विझलेल्या पणत्या ठेवलेल्या आहेत. आता मी या एका पेटलेल्या पणतीनं या सगळ्या पणत्या प्रज्वलित करतो.’ बोलता बोलता सरांनी एक पेटलेली पणती उचलून एक एक करून सगळ्या न पेटलेल्या पणत्या पेटवल्या आणि पुढे म्हणाले, ‘आता तुमच्यापैकी कुणाला शक्य असेल तर एक पेटता बल्ब किंवा ट्युबलाईट घेऊन या गेलेल्या ट्युबलाईटस् आणि बल्ब पेटवून दाखवावेत.’
त्या ‘पुढारलेल्या’ विद्यार्थ्यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे झाले होते. त्यानंतर सरांनी आम्हाला ‘दीपप्रज्वलनाचं महत्त्व’ आणि ‘दिवा म्हणजे नेमकं काय?’ हे समजावून सांगितलं होतं.
आज दिवाळीच्या निमित्तानं लेख लिहिताना मला कॉलेजमधील तो प्रसंग आठवला. आजही आपल्याकडे डाव्या विचारांची आणि स्वतःला लिबरल समजणारी अनेक मंडळी दिवाळीच्या सणातील दिव्यांना विरोध करतात. ‘किती प्रदूषण होतं? किती तेल वाया जातं?’ असले प्रश्न विचारून सर्वसामान्य माणसांच्या मनात धार्मिक प्रथांविषयी कुशंका निर्माण करतात. संभ्रम निर्माण करतात.
ही मंडळी स्वतः मात्र अख्खा दिवस एअर कंडिशनमध्ये बसतात, फाईव्ह स्टार हॉटेलात जमून पार्ट्या करतात. निषेध करताना हातात पेटत्या मेणबत्या घेऊन मोर्चे काढतात. भारी भारी किमतीची कॉस्मॅटिक्स वापरतात. आपल्या घरातील कुत्र्यांनादेखील ब्युटीपार्लरमध्ये नेऊन हजारो रुपये खर्च करतात. थोड्याशा अंतरासाठी देखील कार वापरून इंधन जाळतात. नको त्या ठिकाणी नको तेवढा पैसा खर्च करतात. त्यावेळी त्यांना गरिबांचा कळवळा येत नाही. त्यावेळी त्यांना पैशाचा अपव्यय आणि उधळपट्टीची जाणीव होत नाही. पण विरोध मात्र दिवाळीतील पणत्यांना केला जातो.
वास्तविक पणती किंवा दिवा हे एक शक्तीचं महान प्रतीक आहे. दिव्याच्या इवल्याशा ज्योतीतदेखील एक अतीप्रचंड ऊर्जा सामावलेली असते. म्हणूनच ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरीतील एका ओवीत म्हणतात, जैसी दीपकलिका धाकुटी | बहु तेजाते प्रकटी | तैसी सद्बुद्धी हे थेकुटी | म्हणो नये ॥ ते आणखी पुढे म्हणतात, जैसा दीपें दीपु लाविजे | तेथ आदील कोण हे नोळखिजे | तैसा सर्वस्वे जो मज भजे | तो मी होऊनि ठाके ॥ माउलींनी दिव्याच्या इवल्याशा ज्योतीला दिलेली सद्बुद्धीची उपमा या ठिकाणी समजून घ्यायला हवी. दिव्याची ज्योत म्हणजे बुद्धी, विद्या, ज्ञान... एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करता येतो. असं करता करता असंख्य दिवे पेटवता येतात. एकदा दिवे उजळले की कोणत्या दिव्याने कोणता दिवा चेतवला हे उमगत नाही. ते सर्व दिवे एकसारखेच प्रकाशतात. ज्ञानाच्या बाबतीतही हाच प्रकार करता येतो. आपण तो करायला हवा. आपल्याला मिळालेलं ज्ञान हे केवळ स्वतःजवळ न ठेवता ते समाजातील दुर्बल घटकांमध्ये वाटायला हवं. दुर्बलांना ज्ञानसबळ करायला हवं. नामदेवमहाराज देखील एका अभंगात हेच सांगतात - नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी | हा ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा सण म्हणजे दिवाळी. या दिवाळीला आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्या ओळखीपाळखीतील किमान एका गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अल्प-स्वल्प मदत करून त्याला स्वयंपूर्ण होण्यास हातभार लावूया. ज्योतीने ज्योत पेटवत पेटवत समाजातील अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करूया. जगातील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या विद्याधनाचं दान करूया. विद्येविषयी एक संस्कृत श्लोक आठवला तो सांगतो. न चोरहार्यं न राजहार्यं न भ्रातृभाज्यं नच भारकारी व्यये कृते वर्धति एव नित्यं विद्याधनम् सर्व धनात प्रधानम् भावार्थ : विद्या हे असं एकमेव धन आहे की जे चोर चोरी करून नेऊ शकत नाही. ज्यावर राजा किंवा सरकार कर लावू शकत नाही. ज्या धनाची भावंडांत विभागणी किंवा वाटणी होत नाही. हे धन इकडून तिकडे नेताना त्याचा यत्किंचितही भार होत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे धन जेवढं खर्च करू तेवढं ते वाढतच जातं. म्हणून विद्या हे सर्व धनामध्ये सर्वश्रेष्ठ धन मानलं जातं. विद्या हा शब्द उलट करून वाचला तर द्यावी असा आदेश मिळतो. विद्या ही नेहमी द्यावी. देत राहावी. समाजातील अज्ञान दूर करण्याचा आपापल्या परीनं प्रयत्न करावा. त्याचबरोबर स्वतःदेखील ज्ञानी माणसांच्या संगतीत राहून नवनवीन ज्ञान संपादन करावं. विविध विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तकं, ग्रंथ वाचून त्यातून ज्ञान मिळवावं. थोरामोठ्यांची चरित्रं अभ्यासावीत. त्यातून प्रेरणा घ्यावी. आपलं आयुष्य उजळावं, त्याचबरोबर तो उजेड इतरांच्या आयुष्यातही सामाविष्ट करण्याचा प्रयत्न करावा. हाच तर दिवाळीचा खरा संदेश आहे. ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वरीत दिवाळीबद्दल म्हणतात. मी अविवेकाची काजळी | फेडूनि विवेकदीप उजळी | ते योगिया पाहि दिवाळी | निरंतर ॥ ज्या दिवशी आपण स्वतः ज्ञानप्राप्ती करतो आणि प्राप्त केलेलं ज्ञान दुसऱ्यांना देतो तो प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातील दिवाळीच असतो. या लेखाच्या निमित्ताने माझ्या सर्व वाचकांना अशा प्रकारच्या निरंतर दिवाळीच्या तेजोमय शुभेच्छा.