
कथा : प्रा. देवबा पाटील
सीता आणि नीता या सख्ख्या बहिणीच असल्याने दोघींचे आपसातही छान मेतकूट जमायचे. दोघीही नेहमी सोबतच राहायच्या, एकाच ताटात जेवायच्या, सोबतच खेळायच्या, शाळेत जायच्या, एकाच बाकावर बसायच्या, अभ्यास सोबत करायच्या नि सोबतच झोपायच्या. त्या अभ्यास जरी सोबत करायच्या तरी पण त्यांच्यामध्ये परीक्षेत जास्तीचे गुण मिळविण्याची जीवघेणी स्पर्धा मुळीच नसायची. खेळीमेळीने राहायच्या, मुळीच नाही भांडायच्या. हसत खेळत अभ्यास करायच्या, एकमेकींना अभ्यास सांगायच्या, विचारायच्या, एकमेकींचा अभ्यास घ्यायच्या. आई-वडिलांचे त्यांच्यावर तसे समभावाचे छानपैकी संस्कार होते. असे ते छोटेसे चौकानी कुटुंब सदैव आनंदात राहायचे, आपापले कर्तव्य चोखपणे पार पाडायचे.
त्यांच्या मावशीने त्यांच्यासाठी त्यांचा आवडता खाऊ आणला होता. मावशीने त्यांच्यासाठी प्रा. देवबा पाटील ह्यांचे एक छानसे “आकाशाचे रंग” नावाचे छोटेसे पुस्तक आणलेले होते. संध्याकाळी मावशी त्यांना ते पुस्तक वाचून समजावून सांगणार होती. हो ना! मावशी प्राध्यापिका होती भौतिकशास्त्राची नि पुस्तक होते विज्ञानाचे.
त्या तिघंही चटई घेऊन घराच्या गच्चीवर गेल्या. चटई अंथरली व तीवर बसल्या. मावशीने आकाशाकडे नजर टाकली. नुकताच सूर्यास्तारंभ होत होता. निळ्या आकाशावर तांबड्या रंगाची छटा सुरू झाली होती. मावशीसोबत सीता नि नीतानेसुद्धा आकाशाकडे बघितले.
आता त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली व शेवटी न राहवून त्या थोड्याशा मागे-पुढे बोलत म्हणाल्याच “मावशी! तू आम्हाला “आकाशाचे रंग” हे पुस्तक देणार होतीस ना आणि त्या पुस्तकातून आकाशाच्या रंगांबद्दल समजावून सांगणार होतीस ना! मग दाखवं ना आम्हाला ते पुस्तक लवकर!”
मावशीने आपली छोटीशी पर्स उघडली व त्यातून ते पुस्तक बाहेर काढले नि त्यांच्या हातात दिले. ते पुस्तक बघताच दोघींनाही खूप खूप आनंद झाला. त्याचे सुंदर मुखपृष्ठ बघून दोघीही आनंदाने मोहरून गेल्या. त्यांनी ते पुस्तक दोघींच्या मध्यभागी ठेवले व उत्साहाने त्याचे एकेक पान पलटू लागल्या. पुस्तकातील छान छान चित्रे बघून त्यांची चौकस बुद्धी नवीन जोमाने जागी झाली. “सांगा बरे, सूर्यप्रकाशात किती रंग आहेत हे माहीत आहे का तुम्हाला?” मावशीने प्रश्न केला. “हो, सात रंग आहेत.” दोघींनीही सोबतच उत्तर दिले. “कोणकोणते आहेत ते रंग?” मावशीने विचारले. “ता, ना, पि, हि, नि, पा, जा” दोघींनीही एकसुरात उत्तर दिले. “दोघीही आळीपाळीने एकेका रंगाचे पूर्ण नाव सांगा.” मावशी म्हणाली. “तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा.” आळीपाळीने दोघींनीही सांगितले. “बरीच माहिती आहे गं तुम्हाला!” असे म्हणत मावशी पुढे सांगू लागली. “मुलींनो, इंद्रधनुष्याचे सातही रंग ओळखता येतात पण माणसाच्या मनातील रंग ओळखणे अतिशय कठीण असते. म्हणून तर मुलींनी जगात वावरतांना सदैव सावध राहावे. असो. तर आपला सूर्यप्रकाश हा सात रंगांचा बनलेला असून या सात रंगांपासून पांढरा रंग तयार होतो म्हणून सूर्य आपणास पांढरा दिसतो. हा प्रकाश आसमंतात लहरींच्या म्हणजे तरंगांच्या स्वरूपात प्रवाहित होत असतो. प्रत्येक रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी ही वेगवेगळी असते. तांबड्या रंगाची तरंगलांबी ही सर्वात जास्त असते. सर्वात कमी तरंगलांबीचा प्रकाश म्हणजे निळ्या रंगाचा प्रकाश होय. कमी तरंगलांबीच्या प्रकाशाच्या विकिरणामुळे आकाशाला निळा रंग येतो.” “विकिरण म्हणजे काय मावशी?” सीताने प्रश्न केला. “प्रकाशाचे विकिरण होणे म्हणजेच प्रकाश सर्व दिशांनी पसरणे, विखुरणे. प्रकाशाच्या विकिरणाची क्रिया ही वातावरणातील धूलिकणांमुळे विशेषत: हवेच्या रेणूंमुळे घडून येते.” मावशीने सांगितले. एवढ्यात गावातील विद्युत खंडित झाल्याने गच्चीवर अंधार पडला आणि त्यांच्या ज्ञानवर्धनाच्या गप्पांमध्येसुद्धा खंड पडला. मावशीने त्यांना उठायला सांगितले. त्याही उठून उभ्या राहिल्या व मग त्या तिघीही खाली आल्यात.