Saturday, October 18, 2025
Happy Diwali

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये यापूर्वी फटाक्यांची विक्री होत असली तरी आता सरसकट रस्त्यांवरही मोठ्या आवाजांच्या फटाक्यांची विक्रीचे स्टॉल्स लागले जात आहेत. विशेष म्हणजे मुंबईतील दादरसारख्या गजबजलेल्या भागांमध्ये एकाला खेटून एक अशाप्रकारे मोठया संख्येने फटाक्यांची दुकाने लावली गेलेली आहेत. ज्यामुळे या गर्दीच्या ठिकाणी आगीसारख्या दुघर्टनेची भीती व्यक्त् केली जात आहे. मात्र, अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानाधारक विक्रेत्यांची तपासणी करण्याचे अधिकार मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना असले तरी अनधिकृत स्टॉल्सची जबाबदारी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाची आहे. परंतु, असे असूनही महापालिका अधिकारी आणि पोलिस यांच्या आशीर्वादामुळे दादरमध्ये पावलोगणिक फटाक्यांची विक्रीचे स्टॉल्स लावले जात असल्याने भविष्यात याठिकाणी काही घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दीपावली निमित्त दादर पश्चिम भागातील डिसिल्व्हा रस्ता आणि जावळे मार्गावरील पदपथांवर मोठ्याप्रमाणात फटाक्यांची दुकाने लावण्यात आली आहेत. दादरसारख्या गर्दीच्याठिकाणी मोठ्या आवाजाचे फटाके शगुन हॉटेलपासून पुढे सलग सात स्टॉल्स लावण्यात आले आहे, तर या मार्गावर एकूण १० ते १२ फटाक्यांचे स्टॉल्स आहेत, तर जावळे मार्गावरही अशाचप्रकारे फटाक्यांची विक्री केली जाते. विशेष म्हणजे दादरमधील या दोन्ही गल्ली तथा रस्ते हे दाट गर्दीचे मानले जातात. याठिकाणी मोठ्याप्रमाणात खरेदीला नागरिक येत असल्याने कायमच गर्दी होत असते. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या आवाजाचे तथा स्फोटक फटाक्यांची विक्री कशाप्रकारे केली जाते असा सवाल आता स्थानिकांकडूनच केला जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या आवाजाचे मोठया प्रमाणात फटाक्यांचे स्टॉल्स लागले असून शुक्रवारी पोलिसांच्या माध्यमातून काही कारवाई झाली. त्यांनी काही साहित्य जप्त केले. पण हे स्टॉल्स काही बंद झालेले नाही. मुंबई अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परवानाधारक फटाके विक्रीच्या स्टॉल्सची तपासणी अग्निशमन दलाचे अधिकारी करू शकतात, पण रस्त्याच्या पदपथावरील स्टॉल्स हे अनधिकृतच आहेत. त्यामुळे विभागाच्या महापालिका अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी करून अशाप्रकारच्या स्टॉल्सवर कारवाई करायला हवी. फटाक्यांची विक्री ही गर्दीच्या ठिकाणी करताच येत नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

दादरमध्ये फेरीवाल्यांना बसवतो कोण? हेच महापालिकेचे आणि पोलिस ना!जर या दोघांनी मनात आणले तरी एकही फेरीवाला दादर रेल्वे स्थानकाबाहेर बसू शकणार नाही.आता हे जे फटाक्यांचे स्टॉल्स लावले आहेत, त्यांनाही याच अधिकाऱ्यांनी बसवले आहेत. पोलिसांच्या बीट ऑफीससमोर असे व्यवसाय लागत असताना पोलिसांना ते दिसत नाही का? त्यामुळे या फटाक्यांमुळे जर काही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास त्यात दुकानांचे तर नुकसान होईलच, पण गर्दीतील नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तशाप्रकारची दुघर्टना घडल्यास त्याला सर्वस्वी महापालिका आणि पोलिस अधिकारीच जबाबदार असतील.

सुनील शाह, अध्यक्ष, दादर व्यापारी संघ

Comments
Add Comment