Saturday, October 18, 2025
Happy Diwali

आत्मनिर्भरतेची ‘तेजस’ भरारी

आत्मनिर्भरतेची ‘तेजस’ भरारी

संरक्षण उत्पादनात १०० टक्के स्वदेशीकरणाचा संकल्प : राजनाथ सिंह

नाशिक : भारताच्या संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भरते'च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या नाशिक येथील कारखान्यात हलक्या लढाऊ विमानाची तेजस एमके १ एची तिसरी आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-४० ची दुसरी उत्पादन लाइन राष्ट्राला समर्पित केली. या सुविधेमध्ये तयार झालेल्या पहिल्या एलसीए एमके १ ए विमानाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.

संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात एलसीए एमके १ एला संरक्षण क्षेत्रातील भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे 'झळाळते प्रतीक' असे गौरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या दशकांत संरक्षण उत्पादन क्षेत्रात केलेले बदल स्पष्ट करताना ते म्हणाले, "एक काळ होता जेव्हा आपण ६५-७०% लष्करी हार्डवेअर आयात करत होतो, पण आज आपण ६५% उपकरणे स्वतःच्या भूमीत बनवत आहोत." आगामी काळात हे देशांतर्गत उत्पादन १००% पर्यंत वाढवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे राजनाथ सिंह यांनी जाहीर केले.

यावेळी सिंह म्हणाले की, एचएएलच्या ओझर प्रकल्पात मिग, सुखोई ३०, आणि प्रशिक्षणार्थी विमानांची निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेले उड्डाण हे देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचे उड्डाण आहे. गेल्या सहा दशकांपासून कार्यान्वित एचएएल संरक्षण उत्पादनांसाठी महत्त्वाचे आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत देशाला संरक्षण उत्पादनांबाबत परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत असे. ६५ ते ७० टक्के साहित्य आयात केले जात असे. आता या परिस्थितीत बदल होत आहे. आता ६५ टक्के साहित्य देशातच तयार होत आहे. लवकरच सर्व साहित्य देशांतर्गत तयार करण्यात येईल. एचएएलने विविध संस्थांच्या सहकार्याने उत्पादित केलेली लढाऊ विमाने ही देशासाठी गौरवाची बाब आहे.देशाचे हवाई दल नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांमुळे अधिक मजबूत होईल.

सध्या युद्धनीतीत बदल होत आहेत. वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाया लढल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर, ड्रोन सिस्टिम आणि नेक्स्ट जनरेशनमधील विमाने भविष्यातील लढायांची दिशा निश्चित करतील. एचएएलमध्ये निर्मित मिग २१ विमानांची देशांच्या सीमांचे संरक्षण केले. त्यात एचएएलचे योगदान उल्लेखनीय आहे, असे सांगत त्यांनी अलीकडेच राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस एचएएलने पूर्ण क्षमतेने काम केले.

Comments
Add Comment