सफरचंद हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे. डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात, कारण त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असते. मात्र, अनेकांना याबाबत संभ्रम असतो की सफरचंद सालासकट खावे की साल काढून? काही लोक स्वच्छतेच्या कारणास्तव सफरचंद सोलून खातात, तर काहीजण पोषणमूल्य लक्षात घेऊन सालासकट खातात.
तज्ज्ञांच्या मते, सफरचंद सालासकट खाणे जास्त फायदेशीर आहे. कारण सालीमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. सफरचंदाच्या सालीमध्ये क्वेर्सेटिन नावाचे अँटी-इंफ्लेमेटरी संयुग असते, जे फुफ्फुसांचे संरक्षण करते आणि श्वसनाशी संबंधित आजारांपासून बचाव करते. तसेच सालीतील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य टिकून राहते.
याशिवाय, सालीमध्ये भरपूर फायबर असल्याने ते पचनसंस्थेला कार्यक्षम ठेवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, ज्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. बद्धकोष्ठता, गॅस किंवा पोटफुगीचा त्रास असलेल्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरते.
सफरचंदाच्या सालीत जीवनसत्त्वे अ, क आणि के तसेच पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व घटक मेंदू, हृदय, त्वचा, हाडे आणि मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
परंतु, सफरचंद सालासकट खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सालीवर कीटकनाशकांचे अवशेष असू शकतात. त्यामुळे नीट धुऊन, शक्य असल्यास ऑर्गेनिक सफरचंद निवडणे उत्तम.
एकंदरीत, सफरचंद सालासकट खाल्ल्यास ते अधिक पोषक, फायदेशीर आणि आरोग्यवर्धक ठरते.