Saturday, October 18, 2025
Happy Diwali

Chandshaili Ghat Accident : नंदुरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात; भाविकांची पीकअप जीप दरीत कोसळून ६ ठार, १५ हून अधिक गंभीर जखमी

Chandshaili Ghat Accident : नंदुरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात; भाविकांची पीकअप जीप दरीत कोसळून ६ ठार, १५ हून अधिक गंभीर जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या पीकअप जीपला (Pickup Jeep) चांदशैली घाटात मोठा अपघात झाला. भरधाव वेगात असलेली ही पीकअप जीप अचानक खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याशिवाय, १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य (Rescue Operation) सुरू केले.

सर्व जखमींना तत्काळ तळोदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवदर्शनासाठी, यात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे नंदुरबार जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

अपघातात मृतांची संख्या वाढण्याची भीती

नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात झालेल्या भीषण अपघातात प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याने दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या जखमी झालेल्या या सर्व भाविकांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी हलवण्यात येत आहे. पीकअप व्हॅन घाटातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. गाडी पलटी झाल्यामुळे वाहनाच्या मागच्या भागात बसलेले लोक खाली दबले गेले आणि अनेकांना जबर मार लागला. याच कारणामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य (Rescue Operation) हाती घेतले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. बचावकार्यासाठी पोलीस घटनास्थळी आले, तेव्हा येथील दृश्य भयावह होते. अनेक लोक जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते, त्यापैकी अनेकजण गंभीर जखमी दिसत होते. या भीषणतेमुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment