
नवी दिल्ली : महिला विश्वकप स्पर्धेतील १८व्या लीग सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सलग चौथा विजय नोंदवत गुणतालिकेत दुसरे स्थानही पटकावलं आहे.
पावसामुळे हा सामना २० षटकांचा खेळवण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे आफ्रिकेच्या या विजयाने भारताची धाकधूक वाढली असून भारताचे टॉप ४ मधील स्थान धोक्यात आले आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या १२ षटकांत श्रीलंकेने २ गडी गमावत केवळ ४६ धावा केल्या. मात्र, त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला.
जवळपास पास तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सामना पुन्हा सुरु झाला. मात्र, हा सामना २०-२० षटकांचा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे श्रीलंकेने २० षटकांत ७ गडी गमावत १०५ धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेकडून विश्मी गुणरत्नेने सर्वाधिक ३४ धावा केल्या. पण याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून मारिजाने कॅप आणि नॉनकुलुलेको म्लाबा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर मसाबाता क्लासने २ आणि नादिन डी क्लर्कने १ विकेट घेतली.
दरम्यान, आफ्रिकेच्या या विजयाने भारताची धाकधूक वाढली आहे. भारताचं टॉप ४ मधील स्थान धोक्यात आले आहे. गुणतालिकेबाबत बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाकडे ९ गुण आहेत. त्यांनी यापूर्वीच सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले आहे. तर आफ्रिका ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून त्यांचे काही सामने बाकी आहेत. यापैकी एक सामना जरी जिंकला, तरी त्यांची सेमीफायनलकडे जाण्याची वाट मजबूत होणार आहे. याशिवाय इंग्लंडने ७ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडकडे ३ गुण आहेत.