
मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाचा जोर पुन्हा वाढून कापणीला आलेल्या शेतीचे नुकसान होणार का? असा प्रश्न पडला आहे.
एकाबाजूला हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असताना, सांताक्रूझ येथे शुक्रवार, १७ ऑक्टोबरला ३७ अंश सेल्सिअस कमाल तापामानाची नोंद झाली. संपूर्ण राज्यातील तापमानाची नोंद पाहता शुक्रवारी सांताक्रूझ येथे सर्वाधिक तापमान असल्याचे नोंदले गेले.
राज्यात मोसमी पावसाने माघार घेतल्यामुळे समुद्रावरून येणारे वारे उशिरा वाहत आहेत. यामुळे तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान खात्याने सांगितले. त्यामुळे अनेक भागात ३४ ते ३६ अंशादरम्यान तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
दरम्यान गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडून सणांचा आनंद घेता आला नाही. नुकतेच हवामान खात्याने दिवाळीमध्येही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवल्यामुळे नागरिकांनी दिवाळी साजरी करताना सुद्धा मज्जा घेता येणार नसल्याचे दिसते.