Thursday, December 25, 2025

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व विकासकार्य महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. याअनुषंगाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी महालक्ष्मी मंदिर येथे शनिवारी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन परिसराची पाहणी केली तसेच या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. महालक्ष्मी मंदिरातील भाविकांचा ओघ पाहता सुशोभीकरण त्याचप्रमाणे परिसरातील इतर कामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना जास्तीत जास्त नागरी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, तसेच दर्शन व इतर सर्व व्यवस्था सुलभ झाली पाहिजे, या दृष्टीने सर्व कामांमध्ये ताळमेळ साधण्याचे निर्देशही यावेळी गगराणी यांनी सर्व संबंधितांना दिल्या.

मुंबईत विविध प्राचीन धार्मिक स्थळे आहेत. त्यामध्ये भुलाभाई देसाई मार्गावर स्थित महालक्ष्मी मंदिराचा प्रामुख्याने समावेश होतो. मंदिर आणि परिसराला भेट देणाऱ्या भाविकांकरिता अधिक चांगल्या नागरी सेवा-सुविधा पुरवता याव्यात, यासाठी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विकास कामे महानगरपालिकेने हाती घेतली आहेत. या पाहणीच्या वेळी डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, महालक्ष्मी मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे सल्लागार वास्तुतज्ज्ञ शशांक मेहंदळे या पाहणीवेळी उपस्थित होते. तसेच, महालक्ष्मी मंदिर न्यासाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. गुपचूप, विश्वस्त एस. व्ही. डोंगरे, एस. एस. वैद्य, एस. के. दांडेकर, व्यवस्थापक एन. व्ही. कांबळी हेही बैठकीवेळी उपस्थित होते.

महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दुकाने तथा गाळे यांची पुनर्रचना करून सुसूत्रीकरण करणे व रस्त्यांची सुधारणा करणे; मार्गावरील भिंतींवर कलात्मक रंगरंगोटी करणे; पुरातन वारसा (हेरिटेज) शैलीतील विद्युत खांब आणि स्ट्रीट फर्निचर उभारणे; मार्ग दर्शक फलक (वे-फाइंडिंग साइनबोर्ड्स) स्थापित करणे; मुख्य मार्गावर आकर्षक कमानी उभारणे; गर्दीच्या नियोजनासाठी आवश्यक उपाययोजना करणे; परिसरात आकर्षक विद्युत रोशनाई करणे; आवश्यकतेनुसार भित्तीशिल्पे (म्युरल) साकारणे यासह इतर बाबींचा सुशोभीकरण कामांमध्ये समावेश आहे. दरम्यान, महालक्ष्मी मंदिर न्यासाकडून प्रस्तावित भक्तनिवास जागेचीही गगराणी यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे मंदिराच्या मागील बाजूस मुंबई किनारी रस्त्याच्या दिशेने निर्गमन मार्ग व तेथील संभाव्य कामे, उपाययोजना यांचीही त्यांनी माहिती जाणून घेतली.

Comments
Add Comment