
सिडकोकडून नागरिकांना िदलासादायक निर्णय
खारघर : खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या भागातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकृत माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. बेलापूर येथील सिडको भवनामध्ये बुधवारी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, विनोद घरत, साजिद पटेल, आशा बोरसे, जगदीश घरत, सचिन वास्कर आणि संतोष पाटील यांनी नागरिकांच्या वतीने पाणी प्रश्नावर सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीला सिडकोचे अधीक्षक अभियंता पी.एम शेवतकर उपस्थित होते. बैठकीदरम्यान तळोजा फेज १ व २ तसेच खारघर सेक्टर २३, २७, ३०, ३४, ३५, ३६, ३९ आणि ४० या भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिडकोने दिलेल्या लेखी पत्रानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेकडून अतिरिक्त एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. हेटवणे धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा वाढविण्यासाठी मागणी नोंदविण्यात आली. खारघर सेक्टर २६ मधील पंप हाउस येथे नवीन पंप बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण झाल्यानंतर पुरवठा अधिक सुरळीत होईल.
भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सातत्याने पुढे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी सांगितले की, नागरिकांच्या हितासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सिडकोकडे मागणी करत होतो. अखेर सिडकोने सकारात्मक प्रतिसाद देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली.