
मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावली निमित्त महिला बचत गटांनी बनवलेल्या फराळासह इतर वस्तूंच्या विक्रीसाठी मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने महापालिका मुख्यालयासह विभाग कार्यालयांमध्ये महिला बचत गटांचे स्टॉल्सचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. भायखळा ई विभाग कार्यालयातील आयोजित प्रदर्शनात ३५ महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला होता. महिला गटांच्या उत्पादित वस्तूंची विक्री योग्यप्रकारे झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
मुंबई महानगरपालिका( ई विभाग )अंतर्गत महिला व बालकल्याण योजना तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत दिवाळी पूर्व महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य दिव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रम १६ व १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३५ गटाने यामध्ये सहभाग नोंदवला आहे. नियोजन विभागाच्या संचालक संचालक नियोजन डॉ. प्राची जांभेकर व ई विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित त्रिवेदी तसेच सहायक अभियंता (परिरक्षण) योगेश चौधरी, समाज विकास अधिकारी मनोज कुमार शितूत, समुदाय संघटक दिनेश केळुसकर, विकास घरवाढवे, सुवर्णा सावंत, श्रद्धा मिरगुंडे त्यांचे मोलाचे सहकार्य होते.
या प्रदर्शनामध्ये दीपावली निमित्त फराळ तसेच तोरण आणि कंदिल यांची खरेदी महापालिकेच्या कर्मचारी,अधिकाऱ्यांसह कामकाजासाठी आलेल्या नागरिकांनीही करत या महिला बचत गटांच्या उत्पादनाची खरेदी करत त्यांना सहकार्य केले.