
वरळीतील 'त्या' वाडीतील १६९ अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त
मुंबई (खास प्रतिनिधी) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प लगत आणि वरळी येथील खान अब्दुल खान गफार मार्ग येथे असलेल्या मद्रासवाडीतील एकूण १६९ अनधिकृत बांधकामांवर अखेर महापालिकेच्यावतीने बुलडोझर चढवण्यात आला. महापालिकेच्या जी (दक्षिण) विभागाकडून ही धडक कारवाई करण्यात आली.
अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जात आहे. या अनुषंगाने, उपायुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, जी (दक्षिण) विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या नेतृत्वात ही कारवाई हाती घेण्यात आली होती.
कोस्टल रोडच्या भिंतीला खेटून चिखलाच्या जागेत या झोपड्या अनधिकृतपणे बांधल्या होत्या. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नसल्याने याठिकाणी पावसाचे पाणी साचले जात होते. त्यामुळे या मद्रासवाडीतील वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्यावतीने तोडक कारवाई होती घेण्यात आली. यात तब्बल १६९ अनधिकृत बांधकामांचा समावेश होता. यात सिमेंटच्या वापर करत पक्क्या झोपड्या बांधल्या होत्या. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी (दक्षिण) विभागाच्यावतीने ३५ मनुष्यबळ आणि विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान वरळी पोलीस ठाण्याकडून पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाईची ही मोहीम सातत्याने सुरू राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.