Friday, October 17, 2025
Happy Diwali

‘टेस्ला मोमेंट’ चाकणमध्ये सुरू : मुख्यमंत्री फडणवीस

‘टेस्ला मोमेंट’ चाकणमध्ये सुरू : मुख्यमंत्री फडणवीस

पुण्यात बॅटरीची अदलाबदल करता येणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रकचे अनावरण

पुणे : बॅटरीची अदलाबदल करता येणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रकचे अनावरण ही भारतातील मालवाहतूक क्षेत्रातील 'टेस्ला मोमेंट' आहे. यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन आगामी काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई-पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरसारखे अन्य कॉरिडॉर करण्यासाठी सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी चाकण येथे केले.

निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रकच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, ब्ल्यू एनर्जी मोटर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर, धीरेंद्र शास्त्री बागेश्वरबाबा, प्रशांत रुईया, अंशुमन रुईया, अमित बजाज, कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले,‘मालवाहतूक करणाऱ्या ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात इलेक्ट्रिक ट्रकची आवश्यकता होती. या क्षेत्रात ब्ल्यू एनर्जीने उत्तम काम करून ‘मेड इन इंडिया’ ट्रकची निर्मिती केली आहे. देशाचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासारखी आहे. इलेक्ट्रिक ट्रकसाठी संपूर्ण क्लिष्ट अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची संकल्पना आणि निर्मिती, तंत्रज्ञान देशातच त्यातही महाराष्ट्र आणि पुण्यात निर्माण होणे, ही अभिमानाची बाब आहे.

महाराष्ट्र शासनाने ई-वाहन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण, तसेच पर्यायी इंधन धोरण अशी शाश्वत धोरणे स्वीकारली आहेत. या क्षेत्रातील उद्योगाला त्याचा फायदा व्हावा आणि पर्यावरणाचे या माध्यमातून रक्षण व्हावे हे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र शासन मुंबई-पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरसाठी, तसेच अन्यत्रही बॅटरी स्वॅपिंग (अदलाबदल) आणि चार्जिंगच्या कॉरिडॉरसाठी ब्ल्यू एनर्जीसोबत काम करेल. या ट्रकच्या किमती डिझेल वाहनांशी स्पर्धा करणाऱ्या असल्याने या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळणार आहे.

Comments
Add Comment