
वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे मानले जाणारे एमबीबीएस शिक्षण प्राप्त व्हावे, या दृष्टीने लाखो विद्यार्थी व पालक जीवाचे रान करतात. विशेष म्हणजे अभ्यासाबरोबरच यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव इयत्ता अकरावीपासूनच करावी लागते. अशा परिस्थितीत आपल्या राज्यात परराज्यातील विद्यार्थ्यांनी येऊन आपल्या हक्काची जागा बळकावत आहेत. हे प्रकरण मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी उघडकीस आणले व यामुळे अशा गैरप्रकाराने महाराष्ट्रात घुसखोरी केलेल्या परराज्यातील १५२ विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नोटीस बजावण्यात आली.
महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशाची तिसरी फेरी सुरू आहे. तिसऱ्या फेरीची अस्थाई गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज भरला; परंतु या नवीन इच्छुक विद्यार्थ्यांच्या कागदपत्राबाबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारीची सीईटी कक्षाने प्राथमिक तपासणी केली असता त्यामधील १५२ विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळून आले आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी जागरूकता दाखवून हे प्रकरण उघडकीस आणले असले तरी आतापर्यंत महाराष्ट्रात हजारो विद्यार्थ्यांनी या पद्धतीने प्रवेश मिळवत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असल्याची दाट शक्यता आहे. हा प्रकार केवळ मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा नसून यामुळे महाराष्ट्रातील अनेक गरजू व इच्छुक विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १५२ विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली, इथपर्यंत ठीक असले तरी राज्यात अशा गैरमार्गाने वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देणारे काही खूप मोठे रॅकेट कार्यरत आहे. महाराष्ट्रात एमबीबीएस प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीची अस्थायी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या कागदपत्राबाबत सीईटी कक्षाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सीईटी कक्षाने या तिसऱ्या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज भरला त्यांच्या सर्व कागदपत्राची तपासणी केली असता त्यातील १५२ विद्यार्थ्यांची कागदपत्रे चुकीची असल्याचे प्रथमदर्शी आढळून आले. मराठवाड्यातील काही जागरूक विद्यार्थी व पालकांनी याबाबत मुळाशी जाऊन जवळपास चौदाशे नऊ पानांच्या विद्यार्थ्यांच्या यादीचा अभ्यास केला. त्या यादीत असलेली नावे महाराष्ट्र बाहेरील आहेत हे सिद्ध झाले. एवढेच नव्हे तर त्या यादीतील अनेकांनी परराज्यात प्रवेश मिळविला. तो प्रवेश त्यांनी स्वतःच्या राज्यासाठी राखीव असलेल्या कोट्यातून मिळविला होता. म्हणजेच ते विद्यार्थी त्या राज्यातील रहिवासी आहेत हे सिद्ध होते. मग असे असताना त्या परराज्यातील विद्यार्थ्यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या राखीव कोट्यात असलेल्या प्रवेशाच्या यादीत कसे स्थान मिळविले? हा खूप मोठा प्रश्न आहे. याचाच अर्थ ही सर्व प्रक्रिया पाहणारी यंत्रणा सपशेल अपयशी आहे, हे देखील सिद्ध होते. मराठवाड्यातील पालक व विद्यार्थ्यांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर सीईटी कक्षाने या १५२ विद्यार्थांना याबाबत ईमेलद्वारे नोटीस पाठविण्यात आली. या विद्यार्थ्यांना परत मूळ व मूळ कागदपत्रे सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे विद्यार्थी त्यांची मूळ कागदपत्रे अपलोड करणार नाही, त्या विद्यार्थ्यांचा समावेश तिसऱ्या वैद्यकीय प्रवेश फेरीत समावेश होणार नाही. राजस्थानमधील तब्बल ६० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत घुसखोरी केल्याचे गंभीर प्रकरण मराठवाड्यातील नांदेड येथील विद्यार्थ्यांनी समोर आणले. या बनावट रहिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांनी एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवले. घुसखोरी करत त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची तयारी सुरू केली होती. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील खऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होते. या विषयावर मराठवाड्यातून आवाज उठविण्यात आला. मुख्यमंत्री, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी तत्काळ लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देताना १५ टक्के ऑल इंडिया कोटा राखीव असतो, तर उर्वरित ८५ टक्के जागा संबंधित राज्यातील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असतात.
सध्या तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. याच प्रक्रियेत राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि केरळ या राज्यांतील शेकडो विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात प्रवेश मिळवण्यासाठी खोटे रहिवासी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी पूर्वी त्यांच्या मूळ राज्यात विविध प्रवर्गातून प्रवेश मिळवलेला आहे. असे असताना देखील महाराष्ट्रात मात्र नवीन ओबीसी किंवा इतर आरक्षण प्रवर्गांचा त्या विद्यार्थ्यांनी आधार घेतल्याचे उघड झाले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर राजस्थानमधील काही विद्यार्थी त्यांच्या राज्यात अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून पात्र ठरले होते, पण तेच विद्यार्थी महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गातून पात्र ठरल्याचे दिसते, या प्रकरणावरून मराठवाड्यातील जागरूक पालक व विद्यार्थ्यांनी याबाबत आवाज उठविला.
चुकीच्या पद्धतीने वैद्यकीय प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे तर फावते; परंतु जे खरोखर एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी पात्र आहेत अशांवर खूप मोठा अन्याय होतो. भविष्यात अशा फसवणुकीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात घुसणारे विद्यार्थी “गुन्हेगारी प्रवृत्तीचे डॉक्टर” म्हणून समाजात वावरू शकतात. महाराष्ट्र शासनाने अशा विद्यार्थ्यांची तत्काळ चौकशी करून, त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाद करावे. चुकीच्या पद्धतीने एमबीबीएसला प्रवेश मिळवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच त्यांच्या पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मराठवाड्यातील विद्यार्थी व पालकांनी केली आहे. अशा विद्यार्थ्यांना किमान पाच ते सहा वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षणापासून निलंबित करण्याची मागणीही पुढे आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही पूर्वी अशाच प्रकारच्या फसवेगिरीच्या प्रकरणात आरोपी विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
- डॉ. अभयकुमार दांडगे