Sunday, October 19, 2025
Happy Diwali

पंतप्रधान मोदींच्या पंचाहत्तरीनिमित्त एसटीचा आगळावेगळा उपक्रम!

पंतप्रधान मोदींच्या पंचाहत्तरीनिमित्त एसटीचा आगळावेगळा उपक्रम!

राज्यातील ७५ प्रमुख बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा' (वाचनालय) उभारणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई: भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) एक आगळावेगळा, लोकोपयोगी आणि संस्कारमूल्ये जपणारा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील ७५ प्रमुख एसटी बसस्थानकांवर प्रवाशांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी मोफत "वाचन कट्टा" (वाचनालय) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या ३०९ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या महत्त्वाकांक्षी निर्णयाची घोषणा केली.

श्रीकांत शिंदे आणि विनय सहस्रबुद्धे यांची संकल्पना

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला आला आहे. मोदीजींच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘मोफत खुले वाचनालय’ उभारले जाणार आहे, ज्यामुळे ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा दिवा जनतेसाठी प्रज्वलित होईल.

या 'वाचन कट्ट्यांमध्ये' वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, नामदेव ढसाळ, व.पु. काळे, विश्वास पाटील अशा नामवंत साहित्यिकांच्या गाजलेल्या कृती उपलब्ध असतील. यासोबतच एमपीएससी (MPSC) व यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान संदर्भग्रंथ देखील ठेवण्यात येणार आहेत.

"हा ‘वाचन कट्टा’ मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणारा ठरेल आणि समाजात वाचन संस्कृतीचा नवा सुवर्णप्रकाश पसरेल," असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.

“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरी निमित्त आम्ही जनतेसाठी ज्ञानाची ही ‘अनमोल भेट’ देत आहोत. वाचन संस्कृती आणि मराठी साहित्याचा प्रचार हा आमचा लोकाभिमुख उपक्रम आहे.” — प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

Comments
Add Comment