
मुंबई : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -३ या पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी आता सुधारित जाहिरातीनुसार पदभरती होणार आहे. त्यानुसार इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन यांनी दिली आहे.
राज्य शासन निर्णय दि. २७ फेब्रुवारी २०२४ नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (SEBC) प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पदसंख्या वाढवून नव्याने सुधारित आरक्षण संरचना जाहीर करण्यात आली आहे. सुधारित जाहिरातीत काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गातील जागा उपलब्ध झाल्याने इच्छुक उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. इच्छुकांनी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तथापि, कोणी नव्याने अर्ज केला, तर पूर्वीचा अर्ज बाद होऊन नवीन अर्जच ग्राह्य धरला जाईल. अर्ज व सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in/b/recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.