
सोलापुर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून अनेक नेतेमंडळी आपल्या राजकीय समीकरणांनुसार पक्षांतराच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने आगामी महापालिका निवडणुकांसाठी जोरदार मोहीम सुरू केली असून पक्षात मेगा भरतीचा धडाका सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर नेते, माजी नगरसेवक, माजी उपमहापौर तसेच काही दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. काल रात्री जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याचे समोर आले आहे. या हालचालींमुळे मित्रपक्ष असणाऱ्या अजित दादा गटालाही धक्का बसला असल्याची चर्चा आहे. दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीतच मोठा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, “जिल्ह्यातील अनेक बडे नेते भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत. लवकरच सर्व काही स्पष्ट होईल,” असे ते म्हणाले.
माजी उपमहापौर पद्माकर काळे, दिलीप कोल्हे आणि अनेक माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपमध्ये घरवापसीचा मोठा निर्णय
माजी सभागृह नेते सुरेश पाटील आणि बिज्जू प्रधाने यांनी भाजपमध्ये पुनरागमन केले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या पक्ष प्रवेश केला. या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि महिला अध्यक्षा रंजीताताई चाकोते उपस्थित होते.
काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार दिलीप माने भाजपच्या वाटेवर
सोलापुरातील मोठ्या प्रवेश सोहळ्यात माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, सुभाष डांगे, मंदाकिनी तोडकरी, मारुती तोडकरी, कल्पना क्षीरसागर, नागनाथ क्षीरसागर, सुनील भोसले, बिपीन पाटील, मदन क्षीरसागर, रवी काळे, मेघराज कल्याणकर, बाळासाहेब तांबे आणि सुरेश तोडकरी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काय घडलं गुप्तचर बैठकीत?
काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अजित पवार गटातील माजी आमदार राजन पाटील, यशवंत तात्या माने, दिलीप माने तसेच माढ्याचे माजी आमदार पुत्र रणजीत शिंदे आणि विक्रम शिंदे सहभागी झाले होते. या बैठकीत त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात यासाठी तयारी केली होती. श्रीपुर येथे मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच मुंबईत ही निर्णायक बैठक घेण्यात आली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन विरोधी पक्षांना मोठे धक्के देण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक मोठा धमाका काल झाल्याने भाजपला सोलापूर लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनीही भाजप प्रवेशाची तयारी सुरू केली असून त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची सोलापूर विमानतळावर भेट घेतली होती. यासोबत करमाळ्यातील दिग्विजय बागल आणि सांगोला, पंढरपूर येथील काही बडे नेतेही भाजपत प्रवेशासाठी वेटिंगवर असल्याची माहिती समोर आली आहे.