Saturday, October 18, 2025
Happy Diwali

मागच्या दीपोत्सवात केली तक्रार, आता त्याच कार्यक्रमाचे करणार उद्घाटन...

मागच्या दीपोत्सवात केली तक्रार, आता त्याच कार्यक्रमाचे करणार उद्घाटन...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मनसेच्यावतीने यंदाही छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दीपोत्सवाच्या उद्घाटनाला यंदा उबाठा आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे जातीने हजेरी लावणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ज्या उबाठाने मागील विधानसभा निवडणुकीत दीपोत्सवातील खर्च मनसेच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरण्याची मागणी करत या दीपोत्सवावरच टीका केली होती, त्याच उबाठाला आता शिवाजीपार्कमधील मनसेच्या दीपोत्सवात हजेरी लावण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आपण पाहिले. पण येत्या शुक्रवारी पुन्हा हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहे. मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित केलेल्या 'दीपोत्सव' कार्यक्रमाचे उद्घाटन यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

मनसेकडून दीपोत्सव २०२५ कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख आहे. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत की नाहीत, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

उबाठाच्यावतीने २१ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य निवडणूक अधिकारी यांना निवेदन देत, मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून दीपोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे सर्वत्र बॅनर, गेट व कंदिल लावण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे. तसेच या कार्यक्रमाच्या उद्द्घटनावेळी स्थानिक माहिम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार अमित राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविल्याप्रमाणे ही आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याने संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहिम विधानसभा उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा तसेच आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देण्याचा महापालिका अधिकारी व इतर संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी यावर भारत निवडणूक आयोगाने सख्त कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी उबाठाने या पत्राद्वारे केली होती.

परंतु ज्या दीपोत्सवाबाबत उबाठाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती आणि याला परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सख्त कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती, त्याच उबाठाच्या हस्ते शुक्रवारी मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार असल्याने शिवाजीपार्कमधील प्रत्येक जनतेला याचे आश्चर्य वाटत आहे.

शिवाजीपार्कमधील स्थानिकांच्या मते, मागील दीपोत्सवात उबाठा शिवसेनेने राजकारण करत हा दीपोत्सव अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, खरं तर दीपोत्सव एकप्रकारची पर्वणी असते आणि त्याचे उद्घटन उबाठाकडून करणे योग्य ठरणार नाही.

Comments
Add Comment