मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मुंबई हा भाजपाचा गड मानला जात असला तरी मागील आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षाने आता अधिक मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. मागील निवडणुकीत या जिल्ह्यातून भाजपाचे २४ नगरसेवक निवडून आले असले तरी आगामी निवडणुकीसाठी भाजपाने मिशन ३२चा निर्धार केला आहे. उत्तर मुंबईत भाजपाचे २४ नगरसेवक कायम ठेवून आणखी आठ जागा निवडून आणत ३२ नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न राहील असे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांनी दैनिक प्रहारला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
भाजपाचे उत्तर मुंबईचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक बाळा तावडे यांच्याशी त्यांच्या राजकीय जीवनाची वाटचाल, भविष्यातील पक्षाची रणनिती, पक्षाच्या माध्यमातून केली जाणारी कामे, राबवल्या जाणाऱ्या विविध योजना तसेच भविष्यातील राजकीय समिकरणे आदींबाबत चर्चा केली. आपल्या राजकीय जीवनाबाबत बोलतांना ते सांगतात की, मी १९९०मध्ये प्रत्यक्ष पक्षिय राजकारण जोडलो गेलो. तसा मी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतच होतो. पण १९९०मध्ये राम मंदिराच्या उभारणीच्या मागणीसाठी पक्षाचे नेते लालकृष्ण अडवणी यांच्या नेतृत्वाखाली जी रथयात्रा काढली, ती उत्तर मुंबईतून निघाली होती, त्यात सहभागी होत पक्षाचे काम केले. त्यानंतर १९९२मध्ये गोपाळ शेट्टी आणि महेश भट्ट यांच्यासाठी काम केले. त्यावेळी कांदिवली भागात भाजपाचा एकमेव नगरसेवक होते ते म्हणजे के.टी. सोनी. पक्षाचे काम करत असतानाच मी प्रथम वार्डाचा मंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती, पुढे माझ्या कामाने प्रभावित होवून महामंत्री आणि तसेच अध्यक्ष, विधानसभेचा मंत्री, विधानसभेचा अध्यक्ष अशी जबाबदारी पक्षाने सोपवली.
व्यवसायासाठी महापालिका नोकरी सोडली...
सन २०१७मध्ये जेव्हा शिवसेना भाजपाची युती तुटली तेव्हा प्रभाग २० खुला झाला आणि पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली. या मतदार संघात ३३ हजार मतदारांपैंकी ९ हजार मतदार हे मुस्लिम होते. पण माझा व्यावसाय असल्याने, मुस्लिम समाजातील सर्वांशी चांगला संबंध असल्याने तसेच पक्षाच्या सर्वेमध्येही माझे नाव पुढे आल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. माझी उमेदवारी तेव्हा मध्यरात्री साडेतीन वाजता जाहीर झाली होती . या मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून यायचा. परंतु शिवसेनेचे विभागप्रमुख असलेले सुधाकर सुर्वे आणि काँग्रेसचे विनायक पाटील यांचा पराभव करून २२५० मतांनी निवडून आलो. तसा माझा जन्म रत्नागिरी राजापूर खारेपाटणमधील मोसम गावातील. जन्म गावी झाला असला पुढील बालपण मुंबईतच झाले. आमच्या घरातील सर्व महापालिका शिक्षण विभागात कार्यरत कर्मचारी,शिक्षक होते. मी स्वत: महापालिका शिक्षण विभागात कारकून होतो. पण सन २००२मध्ये महापालिकेतील नोकरी सोडून माझ्या व्यावसायात लक्ष दिले. माझे वडिल महापालिका सुरक्षा विभागात होते, वहिनी आणि बहिण महापालिका शाळेत शिक्षिका आहे. माझे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले असे ते अभिमानाने सांगतात.
दिवाळीच्या सुट्टीत राणीबागेत करा मज्जा.. महापालिकेने बच्चे मंडळींसाठी घेतला 'हा' निर्णय
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांना व विशेषतः बच्चे कंपनीला दिवाळी सुटीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता यावा, या उद्देशाने दिवाळी कालावधी दरम्यान ...
पीयूष गोयल मंत्री असूनही मतदार संघात दक्ष
उत्तर मुंबईतील भाजपाच्यावतीने केल्या जाणाऱ्या कामांबाबत तसेच राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देताना ते सांगतात की, उत्तर मुंबईचे खासदार पियुषजी गोयल हे केंद्रीय मंत्री आहेत आणि देशासाठी काम करत असताना ते मतदार संघातही तेवढेच दक्षतेने काम करत असतात. त्यामुळे मतदार संघांमध्ये सुविधा पुरवण्यासाठी त्यांचा सर्व प्राधिकरण आणि संस्था यांच्याशी पाठपुरावा असतो. वर्सोवा मढ मार्वे मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, वर्सोवा ते पुढील उत्तर दिशेच्या कोस्टल रोडकरता आवश्यक एनओसी तातडीने मिळवून दिल्या. कोस्टलरोडसाठी मिठागराच्या जमिनी या केंद्राकडे पाठपुरावा करून राज्याला हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया केली. कोस्टल रोडला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व पुलांची बांधणी याचीही निविदा पूर्ण केली. इनऑर्बिट पासून लगून रोडपर्यंच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली.
तरुणाच्या रोजगारासाठी कांदिवलीत कौशल्य विकास केंद्र...
युवकांना रोजगार मिळावा यासाठी कांदिवलीमध्ये कौशल्य विकास केंद्र उभारले आहे, याठिकाणी वर्षात दहा लाख युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार, शिवाय आणखी दोन केंद्र सरु केली जाणार असून कांदिवलीतच कौशल्य विकासाचे विद्यापीठही सुरु केले जाणार आहे. शताब्दी रुग्णालय हे आता मल्टीस्पेशालिटी बनणार, भगवती रुग्णालय हे ना नफा ना तोटा या तत्वावर धर्मादाय संस्थेकडून चालवले जाणार आहे. नमो नेत्र चिकित्सा शिबिरात १७०० मोतीबिंदूचे निदान, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करणार...
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसा निमित्त एकाच दिवशी नमो नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आला. उत्तर मुंबईतील ४२ प्रभागांमध्ये ६० ठिकाणी हे शिबिर राबवून ५५ हजार चष्म्यांचे वाट करण्यात आले. यामध्ये १७०० नागरिकांच्या मोतीबिंदूचे निदान झाले. त्यांच्या डोळयावरील शस्त्रक्रियाही केली जाणार असून मागील रविवारी यातील ६० जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. भविष्यात या जिल्ह्यात दोन कार्डियाक रुग्णवाहिकांची सेवा पुरवली जाणार आहे. तसेच महापालिका शाळांमधील सर्व मुलांची नेत्र चिकित्सा योजना राबवली जाणार आहे. गरोदर महिलांना पोष्टिक आहार पुरवण्यात येणार आहे, अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत.
महायुतीला विश्वासात घेऊनच जागांचे वाटप...
उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आणि मंत्री पियुष गोयल तसेच यापूर्वीचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यामुळे या मतदार संघात सर्वाधिक आमदार निवडून येत आहेत. सहा आमदारांपैंकी चार आमदार भाजपाचे, तर एक आमदार शिवसेनेचा आणि एक आमदार काँग्रेसचा आहे. या उत्तर मुंबईत ४२ नगरसेवक असून त्यातील भाजपाचे २४ नगरसेवक सन २०१७मध्ये निवडून आले होते. तर शिवसेनेने ०९ नगरसेवक आहेत. त्यामुळे या उत्तर मुंबईतील भाजपाचे २४ जागा तर निवडून आणून कायम राखल्या जाणार आहे. शिवाय महायुतीमध्ये आणखी आठ जागा मिळाल्यास त्याही निवडून आणून उत्तर मुंबईत भाजपाचे ३२ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार आहे. यासर्व जागा शिवसेनेच्या असल्या तरी ज्या जागांवर सध्या उबाठा, काँग्रेसचे नगरसेवक आहेत ते प्रभाग आम्ही चर्चेनुसार, सामजस्याने मिळवण्याचा प्रयत्न करून किंवा मैत्रीपूर्ण परिस्थितीत लढू. ज्या जागा आम्ही सन २०१७च्या निवडणुकीत अगदी काही मतांच्या फरकाने हरलो होतो. त्याच जागांवर आमचा दावा असेल, पण महायुतीला विश्वासात घेवूनच.
ठाकरे एकत्र... पण तशी परिस्थिती नाही!
दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने किंवा आघाडीत राज ठाकरेंचा तिसरा भिडू सामील झाल्याने उत्तर मुंबईतील राजकीय समिकरणात काही बदल होईल का याबाबत सांगताना ते म्हणतात की, उत्तर मुंबईत मराठी माणूस असल्याने या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने टर्निंग पॉईंट होईल असे काहीजण म्हणतात. पण तशी परिस्थिती नाही. मनसेची ताकद बोरीवलीतील एका प्रभागात आहे. मात्र, हे सोडले तर काही कोकणी माणूस उत्तर मुंबईत मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे कोकणी माणसाला आज आपल्यासाठी काम करणारा कोणता पक्ष आहे हे माहित आहे. मराठी माणूस म्हणून कोकणातील जनता पूर्वीप्रमाणे त्यांच्यामागे धावणार नाही. या उत्तर मुंबईचे खासदार हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या माणसाला गावी जाता यावे यासाठी बोरीवली रेल्वे स्थानकात कोकण रेल्वे थांबा देण्याचे काम पियुष गोयल साहेबांनी केले आहे.
कोकणी माणूस महायुतीसोबत...
कोकणात जाणाऱ्यांसाठी ३०० रेल्वे गाड्या सोडल्या गेल्या. एवढेच नाही उत्तर मुंबईतून आमदार योगेश सागर आणि आमदार अतुल भातखळकर यांनी वाजवी दरात ५५० बसेस कोकणात जाण्यासाठी सोडल्या होत्या. त्यामुळे चारकोप, गोराईमधील कोकणी माणसांचा पट्टा हा भाजपाला पुरक आहेतच. मागाठाणे देवीचा पाडा येथीलही कोकणी माणूस हा शिवसेनेचे आमदार सुर्वे यांच्यासोबत आहे. त्यामुळे उत्तर मुंबईत मराठी माणूस हा महायुतीसोबतच राहिल. ठाकरे बांधूच्या माध्यमातून वातावरण निर्मिती होत असली कोकणातील जनतेसह मराठी माणसांचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांवर आहे. आज कोकणातील जनतेसाठी मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून रो रो जलवाहतूक सेवा सुरु करण्यात आली. त्यामुळे विकासाच्या मुद्दयावर सुज्ञ मराठी जनता ही महायुतीससोबतच राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काही पक्ष निवडणूक आल्या की कामाला लागतात!
काँग्रेससोबत जरी हे ठाकरे बंधू गेले तरी काँग्रेसची ताकद ही मालाड विधानसभेतील केवळ ४ मतदार संघांमध्येच आहे. त्यातील दोन वॉर्ड हे मुस्लिम बहुल आहेत. त्यामुळे काँग्रेससोबत गेले तरीही भाजपाचे मिशन ३२ ला ते रोखू शकत नाही,असे सांगत तावडे यांनी स्पष्ट करत काही पक्ष हे निवडणूक आल्या की कामाला लागतात पण भाजपा आणि महायुती हे निवडणुकांच्या आधीपासून काम करत जनतेची कामे केल्यानंतर निवडणुकीला सामोरे जाते. विकासकामांच्या जोरावर भाजपा पक्ष हा मते मागत असल्याचे तावडे यांनी सांगितले.