
काही दशकांपूर्वी भारतातून फरार झालेला आणि १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या कटात हात असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव होणार आहे. ही मालमत्ता सामान्य नागरिकांनाही खरेदीसाठी उपलब्ध असेल. दाऊदची संपत्ती खरेदी करण्याकरिता इच्छुकाला लिलावात सहभागी होऊन मोठी बोली लावावी लागेल. सर्वाधिक बोली लावणाऱ्यास संपत्तीची विक्री होणार आहे.
दाऊदच्या चार मालमत्तांचा जानेवारी २०२४ मध्ये लिलाव झाला. यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुंबाके गावातील दोन भूखंड होते. यातील एक १७३० चौरस मीटरचा आणि दुसरा १७१ चौरस मीटरचा भूखंड होता. या दोन्ही भूखंडांसाठी १.५६ लाख रुपये राखीव किंमत ठेवण्यात आली होती. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी १७३० चौरस मीटरचा भूखंड ३.२८ लाख रुपयांची बोली लावून तर ७१ चौरस मीटरचा भूखंड २.०१ कोटी रुपयांची बोली लावून जिंकला. इतर दोन मालमत्तांसाठी कोणी बोलीच लावली नाही. नंतर श्रीवास्तव यांनी केवळ १७३० चौरस मीटर भूखंडासाठीची रक्कम जमा केली. यामुळे आता नोव्हेंबर २०२५ मध्ये १७१ चौरस मीटरचा भूखंड तसेच बोली न लागलेला १०,४२०.५ चौरस मीटरचा भूखंड आणि ८,९५३ चौरस मीटर भूखंड या तीन मालमत्ता तसेच मुंबाके गावातील २,२४० चौरस मीटर शेती जमीन विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.
या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव सीलबंद निविदांद्वारे होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 'सफेमा'कडून ही लिलाव प्रक्रिया केली जाईल