Thursday, October 16, 2025

कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार : चार महिन्यांत तिसरी घटना, मुंबईतही हल्ल्याची धमकी!

कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार : चार महिन्यांत तिसरी घटना, मुंबईतही हल्ल्याची धमकी!

कॅनडा : प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला असून, गेल्या चार महिन्यांत ही तिसरी घटना आहे. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात गुंड गोल्डी ढिल्लन आणि कुलदीप सिद्धू यांनी स्वीकारली आहे. दोघेही लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सूत्रांकडून सांगितलं जातंय.

सोशल मीडियावर वायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एका वाहनातून गोळीबार होताना स्पष्ट दिसत आहे. खिडकीतून हात बाहेर काढून एका व्यक्तीने पिस्तूलमधून सलग गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सुमारे सहा गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हल्ल्यानंतर ढिल्लन आणि सिद्धू यांनी एक पोस्ट करून जबाबदारी स्वीकारली आणि सर्वसामान्य नागरिकांना दूर राहण्याचा इशारा दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आमचे सामान्य लोकांशी कोणतेही वैर नाही. आमचा वाद फक्त काही विशिष्ट लोकांशी आहे. जे बेकायदेशीर कामात गुंतले आहेत आणि आपले पैसे देत नाहीत, त्यांनी सज्ज राहावे.”

त्यांनी बॉलिवूडमध्ये “धर्माविरुद्ध बोलणाऱ्यांनाही” चेतावणी दिली “गोळ्या कुठूनही येऊ शकतात, तयार राहा,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

याआधी, ८ ऑगस्ट रोजी झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात सुमारे २५ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्या घटनेतील व्हिडिओत हल्लेखोरांचा आवाज ऐकू येतो – “आम्ही लक्ष्याला फोन केला पण त्याने प्रतिसाद दिला नाही, म्हणून आम्हाला कारवाई करावी लागली. जर आता तरी त्याने रिंग ऐकली नाही, तर पुढील कारवाई मुंबईत होईल.” या इशाऱ्यानंतर कपिल शर्माच्या मुंबईतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

पहिला हल्ला १० जुलै रोजी झाला होता. त्या वेळी काही कर्मचारी कॅफेत उपस्थित होते. कोणीही जखमी झाले नसले तरी कॅफेच्या खिडक्यांवर दहा हून अधिक गोळ्या लागल्या होत्या.

पहिल्या घटनेनंतर, बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या दहशतवादी संघटनेशी संबंधित हरजीत सिंग लड्डी याने जबाबदारी स्वीकारली होती. त्याने सांगितले की कपिल शर्माच्या कार्यक्रमात एका कलाकाराने निहंग शिखांच्या पारंपरिक पोशाखांवर विनोद केला होता, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.

BKI या संघटनेला कॅनडाच्या सरकारने दहशतवादी संघटना घोषित केले आहे, तर हरजीत सिंग लड्डी हा भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) सर्वाधिक वॉन्टेड यादीत समाविष्ट आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >