मुंबई : बॉलिवूड फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा या दोघांवर ₹६० कोटीच्या फसवणुकीचा आरोप आहे. हा खटला मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अलिकडेच न्यायालयाने कारवाई करत या जोडप्याला देश सोडून जाऊ नये असे आदेश दिले. यावर युक्तिवाद करताना शिल्पा शेट्टी आणि राजच्या वकिलाने कामासाठी परदेशी जाणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. या युक्तिवाद करताच न्यायालयाने एक अट घातली. ही अट समजताच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांनी परदेशी जाण्याचा विचार सोडून दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांना परदेशात जाण्यापूर्वी ₹६० कोटी जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. ₹६० कोटींच्या फसवणुकीशी संबंधित एफआयआर संदर्भात त्यांच्याविरुद्ध जारी केलेला एलओसी रद्द करण्यासाठी या जोडप्याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे.
शिल्पा शेट्टीने न्यायालयाला माहिती दिली
शिल्पा शेट्टीने आता मुंबई उच्च न्यायालयाला कळवले आहे की तिने तिचा नियोजित परदेश दौरा रद्द केला आहे. तिने सांगितले की न्यायालयाकडून परवानगी नसल्यामुळे तिने हा दौरा रद्द केला आहे.
दोन्ही वेळा उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास दिला नकार
लूकआउट नोटीस रद्द करण्याच्या प्रकरणावर दोनदा सुनावणी झाली आणि दोन्ही वेळा न्यायालयाने शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास नकार दिला.
नेमकं प्रकरण काय ?
उद्योगपती दीपक कोठारी यांनी अलीकडेच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. कोठारींचा आरोप आहे की शिल्पा शेट्टीने तिच्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी ₹७५ कोटींचे कर्ज घेतले होते, परंतु व्याजदरांमुळे ते वैयक्तिक गुंतवणूक म्हणून घेण्यास सांगितले. तिने कोठारींना आश्वासन दिले की ती मासिक व्याज देईन, परंतु शिल्पाने ते पैसे व्यवसायात गुंतवले नाहीत, त्याऐवजी ते वैयक्तिक खर्चासाठी वापरले आणि नंतर संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दीपक कोठारी यांनी अभिनेत्रीला वारंवार पैसे परत करण्याची मागणी केली, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दीपक कोठारी यांनी शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला आहे.