
मुंबई: ‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करणारी रिंकू राजगुरू पुन्हा एकदा नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा आगामी चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असून याबद्दल रिंकूने अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर सांगितले आहे. दीपक पाटील दिग्दर्शित आशा या चित्रपटात रिंकू आशा सेविकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘बाई अडलीये म्हणून ती नडलीये!’ अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमात समाजातील महिलांच्या सामर्थ्याचा आणि संघर्षाचा विषय मांडला आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणारा रिंकूचा कणखर चेहरा प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत आहे. या चित्रपटात रिंकूसोबत दिशा दानडे, साईंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भूजबळ, सुहास शिरसाट आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकारही झळकणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे 'आशा' या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत. त्यामुळे ‘आशा’ या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, हा सिनेमा रिंकूच्या अभिनय कारकिर्दीत नवी उंची निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जागतिक कन्या दिनानिमित्त १० ऑक्टोबरला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत 'आशा' चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग आयनॉक्स, नरिमन पॉईंट येथे पार पडली. यावेळी महिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून दाद दिली.