Thursday, October 16, 2025

पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला

पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला

संघर्षात २१ जणांचा मृत्यू

इस्लामाबाद  : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव आता उघड संघर्षात बदललेला आहे. बुधवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक शहरात हवाई हल्ले केले. हे हल्ले चमन बॉर्डर क्रॉसिंगच्या जवळ करण्यात आले, जिथे अफगाण-तालिबानच्या तीन चौक्यांना लक्ष्य बनवण्यात आले. स्थानिक सूत्रांनुसार, लोकांनी ड्रोन आणि लढाऊ विमानांद्वारे बॉम्ब टाकले जाताना पाहिले. अफगाण सीमा पोलिसांनी सांगितले की, स्फोटांनंतर परिसरात काळा धूर पसरला आणि अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

बुधवारी स्पिन बोल्डकमधील हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये परिसरातून उठणारा घनदाट धूर दिसून येतो. यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर संघर्ष अधिकच वाढला आहे. दोन्ही बाजूंच्या मिळून एकूण २१ जण मृत्युमुखी पडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सहा पाकिस्तानी पॅरामिलिटरी सैनिक मारले गेले, तर १५ अफगाण नागरिक मृत्युमुखी पडले असून डझनभर जखमी झाले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा ताजा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा ११ ऑक्टोबरपासून दोन्ही देशांच्या सीमारेषेवर सातत्याने चकमकी घडत आहेत. या दिवशी अफगाण सुरक्षा दलांनी अनेक पाकिस्तानी पोस्ट्सवर हल्ला केला होता. वृत्तसंस्थेनुसार, अफगाण अधिकाऱ्यांचा दावा आहे की, त्यांनी ५८ पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं, तर पाकिस्तानने म्हटलं की त्यांनी २३ सैनिक गमावले आणि २०० हून अधिक ‘तालिबानी सैनिक आणि दहशतवादी’ मारले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा