ऋतुजा केळकर
देवासमोर ठेवलेला नैवेद्य म्हणजे केवळ पाककृती नव्हे, तर एक भावनांची अर्पणयात्रा असते आणि त्या यात्रेचा शेवट तुळशीच्या पानावर होतो जिथे भक्ती, प्रेम आणि नम्रता एकत्र येऊन देवाच्या ओंजळीत विरघळतात. तेव्हा शिरा म्हणजे केवळ अन्न राहत नाही तो एक प्रसाद होतो.
शिरा करायला घेतला की घरभर एक वेगळाच गंध दरवळतो. रव्याचा खमखमीतपणा, साजूक तुपाचा सुवास, उकळणाऱ्या दुधातली मृदूता… आणि साखरेच्या गोडीत मिसळलेली एक अनाम भावना. पण गंमत अशी की, रोजच्या जेवणातला शिरा आणि सत्यनारायणाच्या पूजेसाठी केलेला नैवेद्य-दोघंही एकाच प्रमाणात बनवले जातात, तरीही त्यांची चव एकमेकांपासून किती वेगळी असते!
रोजचा शिरा भूक भागवतो पण नैवेद्याचा शिरा मन भरतो. त्याच्या प्रत्येक घोटात असते एक शांतता, एक समर्पण. रवा भाजताना मनात मंत्रांची नादमय गुंज भरते जणू, प्रत्येक कणात भक्ती शिजते. दूध उकळताना आठवणींचे फेसाळलेले क्षण उफाळून येतात, ‘कधी आजीच्या हातचा शिरा, कधी आईच्या ओंजळीतला गंध’. साखर विरघळताना अहंकार हळूहळू वितळतो आणि मनात एक गोड नम्रता पाझरते. वेलदोड्याचा दरवळ मनाच्या कोपऱ्यात श्रद्धेचा सुगंध पसरवतो आणि शेवटी, त्यात मिसळतात केळ्याच्या मऊ-मऊ, गोड चकत्या जणू नैवेद्याला पूर्णत्व देणारा अंतिम स्पर्श. त्या केळ्यांत असते प्रसादाची कोमलता आणि देवाच्या ओंजळीत अर्पण होणाऱ्या भक्तीची गोडी, जणू देवाच्या सान्निध्यातील एक निस्संग श्वास.
शेवटी जेव्हा तो शिरा देवासमोर ठेवला जातो, तेव्हा त्यावर अलगद एक हिरवेगार तुळशीपत्र ठेवले जाते जणू, नैवेद्याच्या गोडीत एक भावनेचा शुद्ध स्पर्श मिसळला जातो. एक साधं पान, पण त्याच्या त्या पानाच्या नाजूक रचनेत दडलेलं असतं एक संपूर्ण भावविश्व. त्या पानात असते ‘नम्रता’ जिच्या ओंजळीत अहंकार विरघळतो. असतो समर्पण भाव जो शब्दांशिवायही देवापर्यंत पोहोचतो आणि असते एक न बोलता आलेली प्रार्थना “हे देवा, हे तुझं आहे.”
त्या तुळशीपत्राने खरंच चव बदलते का? की त्या क्षणाच्या पवित्रतेने? की त्या मनाच्या शुद्धतेने? की त्या अर्पणाच्या निःशब्द गहिराईने? त्या क्षणी शिरा केवळ अन्न राहत नाही तो प्रसाद होतो आणि तुळशीपत्र हे केवळ ‘पान’ राहत नाही, ते ‘भक्तीचं प्रतीक’ होतं. मी तर म्हणेन देवासमोर ठेवलेला नैवेद्य म्हणजे केवळ पाककृती नव्हे, तर एक भावनांची अर्पणयात्रा असते आणि त्या यात्रेचा शेवट तुळशीच्या पानावर होतो जिथे भक्ती, प्रेम आणि नम्रता एकत्र येऊन देवाच्या ओंजळीत विरघळतात. तेव्हा शिरा म्हणजे केवळ अन्न राहत नाही तो एक प्रसाद होतो. त्याच्या गोडीत मिसळलेली असते भक्तीची चव, श्रद्धेचा गंध आणि प्रेमाचा कोमल स्पर्श. रोजच्या शिरात जेव्हा आपण प्रेम मिसळतो, तेव्हा तोही नैवेद्य होतो आणि नैवेद्य अर्पण करताना जेव्हा आपण स्वतःला विसरतो, तेव्हा देव त्यात आपली ओळख शोधतो जणू, त्या गोडीतच त्याचं अस्तित्व उमटतं. शिरा बनवताना जर मनात देव असेल, तर तो नैवैद्य होतो. नैवेद्य बनवताना जर मनात भक्ती असेल, तर तो प्रसाद होतो. बाकी रवा, दूध, साखर ते तर सारच निमित्तमात्र अस मी म्हणेन खरी चव तर, त्या मनाच्या शुद्धतेत असते, त्या अर्पणाच्या निःशब्द भावनेत असते.
मी काय म्हणते, नैवेद्य हा केवळ देवासाठी बनवलेला अन्नाचा अर्पण कधीच नसतो, तो तर काळाच्या, ऋतूच्या, मनःस्थितीच्या आणि स्थळाच्या स्पंदनांशी जुळून उमटणारा एक भावगंध असतो. आता श्रावणातल्या सरींमध्ये गरम गरम पुरणाचा नैवेद्य म्हणजे देवाच्या ओंजळीत ठेवलेली एक उबदार आठवण असते तर दिवाळीच्या प्रकाशात लाडवांचा नैवैद्य म्हणजे आनंदाचा सुवास असतो, जो देवापर्यंत पोहोचवताना मनही उजळून तेजाळून निघतं. संक्रांतीच्या सकाळी तीळगुळाचा नैवेद्य म्हणजे गोड बोलण्याची एक मौन शपथ “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” ही केवळ म्हण नसते, ती एक अंतःकरणाची तयारी असते.
पण ऋतू जसजसा बदलतो तसा नैवेद्यही बदलतो आणि त्याचबरोबर बदलते मन. कधी मन प्रसन्न असतं नैवेद्यात उत्सवाची चव असते. कधी मन गहिवरलेलं असतं देवतेच्या विसर्जनाच्या वेळी मग नैवेद्यात मौनाची गोडी असते. कधी घरात गडबड असते, तरी देवासाठी केलेल्या त्या एका लाडवात असते एक शांत समर्पण, तर कधी घरात शांतता असते आणि नैवैद्याच्या एका केळीत असते एक न बोललेली प्रार्थना. मंदिरात अर्पण होणारा नैवेद्य शिस्तीत आखलेला असतो मंत्रोच्चारांच्या लयीत, परंपरेच्या साजशृंगारात. पण घराच्या देवघरात ठेवलेला नैवेद्य तो ओळखीचा असतो, आपलासा आपल्याच घरच्या लाडक्या करताच. त्यात असते आईच्या हाताची ऊब, आजीच्या आठवणींचा गंध आणि मनाच्या कोपऱ्यातून आलेली एक निस्सीम श्रद्धा.
म्हणूनच नैवेद्य म्हणजे केवळ पाककृती नव्हे तर तो मनाच्या ऋतूंना, काळाच्या लयींना आणि श्रद्धेच्या स्पंदनांना अर्पण केलेला एक निःशब्द संवाद असतो. म्हणूनच, एकाच शिऱ्यात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी चव असते. कारण त्यात मिसळलेली असते त्या क्षणाची भावना, त्या मनाची अवस्था, आणि त्या अर्पणाची गहिराई. आणि म्हणूनच, मला असं वाटतं, आपणही जीवन जगताना एक नैवेद्यच घडवतो. परिश्रमाच्या रव्याने, प्रयत्नाच्या खमंग तुपात, यशापयशाच्या साखरेत मिसळून. अर्थात यात आपल्या माणसांची वेलची सोबत असते जी प्रत्येक क्षणाला सुगंधित करते आणि स्वभावातल्या केळ्यासारख्या गोडव्याने आपण त्या नैवेद्याला पूर्णत्व देतो. हे जीवन म्हणजे केवळ संघर्ष नव्हे, ते एक अर्पण आहे. हे अर्पण म्हणजे केवळ कृती नव्हे, तर भावना आहे. जसं नैवेद्य देवासमोर ठेवताना आपण स्वतःला विसरतो, तसंच जीवन जगताना आपणही स्वतःला अर्पण करतो आपल्या माणसांच्या प्रेमात, श्रद्धेत, आणि नम्रतेत. तेव्हा, रोजच्या जगण्यातही एक नैवेद्य घडवूया, असा नैवैद्य जो केवळ देवासाठी नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगासाठी असतो आणि त्या नैवेद्याच्या गोडीत देव आपली ओळख शोधतो. अखेरीस माझ्याच शब्दात सांगायचं झालं तर,
‘तुपात झळकते श्रद्धा, रव्यात खमंग भक्ती...
साखरेत विरघळते नम्रता, केळीत मृदू प्रीती...
नैवेद्य असतो देवाशी निःशब्द संवाद...
जगणंही असो असंच प्रेमळ, पवित्र, समाधानी...’