Thursday, October 16, 2025

स्वीडन दौऱ्यावर मंत्री नितेश राणे, लवकरच मुंबईत जलवाहतुकीत क्रांती

स्वीडन दौऱ्यावर मंत्री नितेश राणे, लवकरच मुंबईत जलवाहतुकीत क्रांती

कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची केली पाहणी

स्वीडन : मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला (Candela) या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली.

या भेटीदरम्यान त्यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला (Candela) कंपनीच्या C8 आणि P12 या अत्याधुनिक बोटींची सफर केली. या बोटी पाण्यावर ग्लाईड होणाऱ्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून, वेगवान, पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम आहेत. P12 ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

कँडेला कंपनीचे संस्थापक आणि सीईओ श्री.गुस्ताव हेसलेसकोग (Gustav Hasselskog) तसेच चीफ कर्मशियल ऑफिसर(Chief Commercial Officer) श्री. नकुल विराट(Nakul Virat) यांनी मंत्री राणे यांना कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेचा आणि तांत्रिक नवकल्पनांचा सविस्तर आढावा दिला. या भेटीदरम्यान महाराष्ट्रात कँडेलाचे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत प्राथमिक चर्चाही करण्यात आली.

मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीतील महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबईत कँडेला(Candela) ची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारी भागांतील जोडणी अधिक मजबूत होईल.

या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतुकीसह किनारी विकास आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल, तसेच नवीन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment