भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी
‘जमदग्नीचा अवतार..’ असे म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर एखादी रागीट व्यक्ती उभी राहते, पण ऋग्वेदातील महर्षी जमदग्नींच्याच खालील ऋचेवरून लक्षात येईल की त्यांना नेमका कशाचा राग येत होता.
न यः संपृच्छे न पुनः हवीतवे न संवादाय रमते।
तस्मात् नः अद्य समृतेः उरुष्यतं बाहुभ्यां न उरुष्यतं ।।ऋ मं८ सू १०१.४
जो मनुष्य कोणत्याही विद्येचा जिज्ञासेने आनंद घेऊ शकत नाही, काहीही शिकण्यात रममाण होऊ शकत नाही, त्यागरूप कर्मरूपी यज्ञात ज्याला रस वाटत नाही, वादसंवादात, चर्चेत ज्याला रुची नसते, अशा माणसापासून परमेश्वराने आम्हाला वाचवावे, अर्थात त्याच्याशी आमचा संपर्क येऊ देऊ नये.
“अरसिकेषु कवित्वं शिरसी मा लिख मा लिख”
अर्थात हे देवी, अरसिकापुढे काव्यगायन करण्याचे विधिलिखित आमच्या कपाळी कधी लिहू नकोस गं लिहू नकोस, या प्रसिद्ध सुभाषिताप्रमाणेच महर्षी जमदग्नींची ही ऋचा आहे. ते मोठ्या कळकळीने आपल्याला आवाहन करतात की,
माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसा आदित्यानां अमृतस्य नाभिः।
प्र नु वोचं चिकितुषे जनाय मा गां अनागी आदितिं वधिष्ट ।।ऋ मं८ सू १०१.१५
सूर्यमंडलातून बाहेर निघणारे तेजःकण हेच रुद्र, देवांचे मातापिता, वसूंच्या कन्या, आदित्याच्या भगिनी व अमृताचे केंद्र होत. अर्थात आपल्याला ज्ञानाची, कार्याची शक्ती देणारे, आपले अवघे जीवन चैतन्यमय करणारे, साधनेचा अमृतानुभव देणारे हे सूर्यनारायणाचे तेज आहे. जाणकार लोकांना जमदग्नी सांगतात की तुम्ही आपल्या जीवनात येणारे हे तेजःकण कधीही नष्ट करू नका. अर्थात रोज उगविणाऱ्या दिवसाचा उन्नतीसाठी योग्य तो उपयोग करून घ्या, आपल्याला मिळणाऱ्या काळाला सत्कारणी लावा.
व्यासंगयुक्त प्रभावी वाणीचे सामर्थ्य महर्षी जमदग्नीं आवर्जून सांगतात. अशा वाणीने लोकसंग्रह होतो, समाजपरिवर्तन होते, राष्ट्राचे उत्थान घडू शकते. ही वाणी शारदेचेच रूप आहे.
वचः विदं वाचं उदीरयन्तीं विश्वाभिः धीभिः उपत्तिष्ठमानां।
देवीं देवेभ्यः परि ईयुषीं गां आ मा अवृक्तं मर्त्यः दभ्रचेताः।।ऋ मं८ सू१०१.१६
वाचेला प्रेरणा देणारी, उत्तम प्रज्ञेने वर्णन केली जाणारी, सर्वांना दिव्यत्व प्रदान करणारी, जमदग्नींसारख्या तापसाकडे सदैव येणारी ही वाणीरूप शारदा आहे. पण तिचे माहात्म्य न जाणता अज्ञानी लोक तिला पराङ्मुख होतात. ज्ञानाचा व्यासंग न केल्याने त्यांना प्रभावी बोलता येत नाही.
महर्षी जगदग्नींच्या या सुंदर ऋचांवरून लक्षात येते, त्यांची ही तळमळीची इच्छा होती की प्रत्येक माणसाने केवळ उदरभरणार्थ जगू नये, परिसंवादात, नवनवीन ज्ञानसाधनेत रस घ्यावा, रोज उगविणाऱ्या दिनकराच्या तेजाकडून ओजस्वी जीवनाची प्रेरणा घ्यावी, आपण मिळविलेल्या विद्येचा वाणीद्वारे प्रसार करावा, म्हणजेच ज्ञानानंद एकट्यानेच न घेता तो प्रसादासारखा सर्वांना वाटावा, कोणाच्या जीवनाला सुंदर
वळण मिळेल, असा वाणीचा उपयोग करावा.
कृतिशील आयुष्य जगावे तरच परमेश्वराने दिलेल्या या अनमोल मनुष्यदेहाचे सार्थक होईल. वैवस्वत मन्वंतरातील सप्तर्षींपैकी जमदग्नी एक ऋषी होत. जमदग्नी व विश्वामित्र यांचा जन्म कसा झाला, हे आपण मागील लेखात पाहिले. ऋचिकऋषींनी अभिमंत्रित केलेल्या यज्ञचरूंची अदलाबदल झाल्याने ब्रह्मतेजाने युक्त असे विश्वामित्र क्षत्रियवंशात जन्मले तर क्षात्रतेजाने युक्त असे जमदग्नी ब्राह्मणवंशात म्हणजे तपस्वी ऋचिकऋषी व सत्यवती यांच्या पोटी जन्मले. जमदग्नी हे जन्मतः धगधगत्या अग्नीसारखे होते. त्यांच्याजवळ जन्मजात विद्या होती. त्यांचे जमदग्नी हे नाव सार्थ होते कारण अग्नीतील तेज, प्रकाश व प्रखरता हे तिन्ही गुण त्यांच्यात होते.
(पूर्वार्ध)
anuradha.klkrn
@gmil.com