Thursday, October 16, 2025

Gujarat Cabinet: गुजरातमध्ये 'राजकीय भूकंप'! मुख्यमंत्री वगळता सर्व १७ मंत्र्यांचे राजीनामे; अमित शहा आजच गांधीनगरमध्ये

Gujarat Cabinet: गुजरातमध्ये 'राजकीय भूकंप'! मुख्यमंत्री वगळता सर्व १७ मंत्र्यांचे राजीनामे; अमित शहा आजच गांधीनगरमध्ये

पटेल मंत्रिमंडळात तीन वर्षांनंतर मोठे फेरबदल; उद्या शहा-नड्डांच्या उपस्थितीत नवीन मंत्र्यांचा शपथविधी

अहमदाबाद : दिवाळीच्या तोंडावर गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना वगळता मंत्रिमंडळातील सर्वच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर सर्व १७ मंत्र्यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले आहेत.

या राजीनामापत्रांवर मंत्र्यांच्या सह्या आधीच होत्या आणि बैठकीनंतर सर्वांनी ते खिशातून काढून दिले, अशी माहिती समोर आली आहे. आता हे राजीनामे औपचारिकपणे राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्याकडे सादर केले जातील.

उद्या होणार शपथविधी; शहा-नड्डांची उपस्थिती

राजीनाम्यानंतर लगेचच उद्या, १७ ऑक्टोबर रोजी नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री ९ वाजता त्यांच्या होम ग्राउंडवर (गुजरात) पोहोचणार आहेत, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा शुक्रवारी सकाळी गुजरातमध्ये दाखल होतील. राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस सुनील बन्सल हेही आज गुजरातला भेट देणार आहेत.

नवीन मंत्रिमंडळात कोणाला संधी?

मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता असलेल्या सर्व आमदारांना फोनवरून माहिती देण्यात आली असून, त्यांना दोन दिवस गांधीनगरमध्ये थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन चेहऱ्यांमध्ये, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अर्जुन मोढवाडिया, अल्पेश ठाकोर, सीजे चावडा आणि हार्दिक पटेल यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच, सौराष्ट्रमधून जयेश राडाडिया आणि जितू वाघानी यांना मंत्रिपद मिळणे निश्चित मानले जात आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर गुजरातमधील पाटीदार आणि ठाकोर समुदायावर विशेष लक्ष दिले जाईल.

फेरबदलाचे कारण काय?

२०२२ मध्ये भूपेंद्र पटेल यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यापासून तीन वर्षांसाठी मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नव्हता. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून या फेरबदलाकडे पाहिले जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या सरकारमधील बहुतेक मंत्री भाजप हायकमांडच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.

याशिवाय, अलीकडेच झालेल्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेते प्रचार करूनही आपच्या गोपाल इटालियांना हरवू शकले नाहीत. या पराभवाचा परिणामही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिसून येणार आहे.

जुन्या दिग्गजांना मिळणार दुसरी संधी?

२०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने विसावदरची जागा जिंकल्यामुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे भाजप कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. भाजपमधील शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या, परंतु काही कारणास्तव बाजूला राहिलेल्या नेत्यांना आता वरिष्ठ पदे आणि नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. पुढील नुकसान टाळण्यासाठी काही जुन्या दिग्गजांनाही दुसरी संधी दिली जाऊ शकते.

'सत्ताविरोधी लाटेचा' परिणाम

नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापासून गुजरात सरकारमध्ये सातत्याने बदल होत आले आहेत. आनंदीबेन पटेल आणि विजय रुपाणी सरकारचे अचानक राजीनामे आणि आता विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सरकारमधील हे बदल, हे सर्व गुजरातच्या लोकांना सत्ताविरोधी लाटेचा (Anti-Incumbency) परिणाम जाणवू लागल्यामुळे होत असल्याची राजकीय चर्चा आहे.

गुजरात सरकारमधील मंत्र्यांची यादी

कनुभाई देसाई – वित्त, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स (पारधी) बलवंतसिंह राजपूत – उद्योग, कामगार आणि रोजगार (सिद्धपूर) हृषीकेश पटेल – आरोग्य, कुटुंब कल्याण आणि उच्च शिक्षण (विसनगर) राघवजी पटेल – कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय (जामनगर ग्रामीण) कुंवरजीभाई बावलिया – पाणीपुरवठा आणि नागरी पुरवठा (जसदन) भानुबेन बाबरिया – सामाजिक न्याय आणि महिला व बाल विकास (राजकोट ग्रामीण) मुलुभाई बेरा – पर्यटन, वन आणि पर्यावरण (खंभलिया) कुबेर दिंडोर – शिक्षण आणि आदिवासी विकास (संतरामपूर एसटी) नरेश पटेल – गाणदेवी बच्चूभाई खबर – देवगड बारिया पुरुषोत्तम सोळंकी – भावनगर ग्रामीण हर्ष संघवी – मजुरा जगदीश विश्वकर्मा - निकोल मुकेशभाई झिनाभाई पटेल – ओलपाड कुणवाजीभाई हलपती – मांडवी (एसटी) भिकूभाई चतुरसिंग परमार – मोडासा

Comments
Add Comment