
हरयाणातील पोलीस यंत्रणा केवळ डागाळलेली नाही तर ती प्रचंड भ्रष्ट आहे आणि त्यात कित्येक पोलीस अधिकाऱ्यांचे बळी गेले आहेत. ७ ऑक्टोबरला वाय पूरन कुमार या हरयाणातील आयपीएस अधिकाऱ्याने खळबळजनक आत्महत्या केली आणि त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. पण संदीप कुमार या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने ज्याने वाय पूरन कुमार यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे काम सुरू केले होते त्यानेही आत्महत्या केली आहे आणि या प्रकरणात दिसते त्यापेक्षा कितीतरी जास्त खोलवर दडलेले आहे असे लक्षात येते आहे. पूरन कुमार यांच्या आत्महत्येनंतर ते दलित असल्यामुळे अनेकांना त्यांच्याबद्दल कढ आला. अर्थात त्यांनी आत्महत्या केली हे वाईटच झाले. तसे होऊ नये. पण पूरन कुमार हे काही बळीचा बकरा नव्हते तर त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आणि त्यामुळेच कुटुंबाची प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून त्यांनी आत्महत्या केली, असे आता समोर आले आहे. पूरन कुमार यांची आत्महत्या काही जातीयवादातून उद्भवलेला प्रकार नव्हता तर भ्रष्टाचारातून झालेले हे हत्याकांड होते असे आता समोर आले आहे. हरयाणात भाजपचे सरकार आहे आणि ते आता बॅकफुटवर गेले आहे, पूरन कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत हरयाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर यांच्यासह आठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर जातीवर आधारित भेदभाव, छळ आणि सार्वजनिक अपमान केल्याचा आरोप केला आहे. आता या प्रकरणाची चौकशी होईल आणि खरे गुन्हेगार समोर येतीलही. पण भाजप सरकार मात्र अडचणीत आले आहे.
पूरन कुमारच्या पत्नी वरिष्ठ शासकीय अधिकारी असून त्या परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत आहेत आणि पूरन कुमार जेव्हा मृतावस्थेत आढळले तेव्हा त्या परराष्ट्र विभागातर्फे जपानमध्ये गेल्या होत्या. दलित आणि एसटी कायद्याखाली आता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, दलित अधिकाऱ्याचा छळ केल्याचे हे प्रकरण असले तरीही यात संदीप कुमार यांच्या आत्महत्येने या प्रकरणाला वेगळाच रंग दिला आहे. कुमार हे भ्रष्ट होते आणि संदीप कुमारनी हरयानातील एका शेतात स्वतःवर गोळी झाढून आत्महत्या केली आहे. त्यावरून हे प्रकरण नुसते जातीयवादाचे नाही तर भयंकर अशा कटकारस्थानानी भरलेले आहे असे लक्षात येते. हरयाणातील आयपीएस अधिकारी पूरन कुमार यांच्या आत्महत्येनंतर आता सायबरसेलचे एएसआय संदीप कुमार यांनी आत्महत्या केली आणि या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून हरयाणा सरकारने शत्रुजीत कपूर यांना प्रदीर्घ सुट्टीवर पाठवले आहे. पण इतक्यावरच हे प्रकरण थांबणार नाही तर या प्रकरणाला जबाबदार असलेल्या प्रत्येकाने आपल्या कामात कुचराई केली आहे, त्यामुळे हरयाणातील संपूर्ण पोलीस यंत्रणाच चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.
हरयाणा राज्य हे एकूणच भ्रष्ट पोलीस आणि सरकारातील गैरकारभारामुळे बदनाम आहे. यापूर्वी तेथे अशोक खेमका या अधिकाऱ्याची तब्बल ५७ वेळा बदली झाली आणि त्याचे कारणही हे होते, की तो अधिकारी प्रामाणिक होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे भूपिंदर सिंह हुडा यांनी खेमका यांची बदली सातत्याने केली होती, या खेमका यांनी रॉबर्ट वडेरा यांचे ग्रुरुग्राम येथील जमीन प्रकरण रद्द करण्यात येऊ नये म्हणून दबाव आणण्यात आला. इतके भ्रष्ट प्रशासन आणि सरकारी यंत्रणा हरियाणात तेव्हा होती, पण आता तेथे पुष्कळच बदल झाला आहे. पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण हे भ्रष्टाचाराचे तर आहेच पण ते जातीयवादाचे आहे आणि यानंतर आणखी एका अधिकाऱ्याच्या आत्महत्येने हे प्रकरण वेगळ्याच प्रकाशात आले आहे. पण या एकूणच प्रकाराने भाजप सरकार मात्र संकटात सापडले आहे, कारण देशात दलितांना घेऊन चालणाऱ्या राजकारणाला धार आली आहे. विरोधी पक्ष घेराबंदी करत आहेत, तर विद्यार्थी संघटना पुढे आल्या आहेत. पूरन कुमार यांच्या आत्महत्येमुळे हरियाणातील संपूर्ण जनजीवन ढवळून निघाले आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही, विरोधी पक्षाचे म्हणणे असे आहे, की हे प्रकरण केवळ एका अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे नाही तर न्याय, समानता आणि सामाजिक सम्मान आणि समानतेचे आहे. काँग्रेसच्या काळातही अनेक दलित अधिकाऱ्यांना हिंसाचार आणि तत्सम जातीयवादाशी संबंधित अत्याचारांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आता काँग्रेसने नाक वर करून दलितांच्या आत्महत्येबद्दल कळवळा आणणे चूक आहे.
पूरन कुमार यांच्या आत्महत्येचे वादळ शमत नाही तोच आणखी एका आत्महत्येने नव्या वादळाची सूचना दिली आहे. हरियाणात आणि पंजाबात सारे काही आलबेल नाही तर साराच गोंधळ आहे हे उघड आहे. या साऱ्या प्रकरणात पोलीस यंत्रणा भ्रष्ट, राज्यकर्ते सारेच आपल्यापलीकडे काही न पाहणारे आणि जनता वाऱ्यावर सोडलेली असे चित्र दिसते. त्याचा परिपाक म्हणजे या दोन आत्महत्या आहेत. यात दोष कुणाचा हे लवकरच समोर येईल. पण एकही हरियाणातील अधिकारी सुरक्षित नाही आणि त्यांच्यावर मृत्यूचे सावट घोंघावत आहे हे निश्चित. या साऱ्या प्रकरणाने भाजपची पंचाईत करून टाकली आहे हे निश्चित. कारण भाजपला हे चांगले माहीत आहे, की जितका या प्रकरणाला रंग चढेल तितका बिहार निवडणुकीत भाजपला फटका बसेल. बिहार असो की हरियाणा तेथे दलित मतांची टक्केवारी जास्त आहे. त्यामुळे बिहारमध्ये दलित मतांची टक्केवारी २०२३ च्या आकडेवारीनुसार १९. ६५ टक्के आहे. त्यांचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही हे म्हणणे जरी योग्य नाही कारण प्रकरण हरयाणातील आहे. पण बिहारच्या दलितांच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद बिहारमध्ये उमटणार हे नक्की. त्यामुळेच भाजप आज अवघड स्थितीत आहे, हरयाणात दलितांची मते २२ टक्के आणि सिरसा आणि अबाला या दोन्ही मतदारसंघात दोन्ही आरक्षित मतदारसंघात भाजपची हार झाली होती, त्यामुळे भाजप सावध झाला आहे आणि हरणायातील या प्रकरणाचा परिणाम बिहार निवडणुकीवर होऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. पूरन कुमार यांच्या आत्महत्येने हरयाणा पेटलेले असतानाच संदीप लाठर यांच्या आत्महत्येने आणखी एका नव्या वादळाची त्सुनामी आणली आहे. त्यामुळे हे प्रकरण निश्चितच दोन अधिकाऱ्यांच्या आत्महत्यांपुरते संपणार नाही, तर कित्येक बळी घेऊन जाईल असे दिसते.