
विरार: विरार परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी विरार पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित तरुणी विरार (पूर्व) येथील नाना नानी पार्कजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. ती स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. त्याच महाविद्यालयातील २१ वर्षीय अमित प्रजापती या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तिने हे संबंध तोडले होते. त्यानंतर अमित सतत तिला त्रास देत होता, अशी माहिती समोर आली आहे.
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
संबंध तोडल्यानंतर आरोपीने तरुणीची आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याद्वारे तो तिच्याकडून पैसे उकळत होता. त्यामुळे तरुणी गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होती. तिच्या वर्तनातील बदल पाहून कुटुंबीयांनी विचारणा केली असता तिने संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी सोमवारी सकाळी महाविद्यालयात जाऊन आरोपीला जाब विचारला. मात्र, आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी उलट वडिलांवरच हल्ला केला. त्यांना मारहाण करण्यात आली.
आत्महत्येची घटना
या प्रकारानंतर दुपारी दीडच्या सुमारास ती घरी आली आणि तिने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर बंगली येथील कार्डीनल ग्रेशस रुग्णालयात नेण्यात आले, मात्र मध्यरात्री दीड वाजता तिचा मृत्यू झाला.
वडिलांचे गंभीर आरोप
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी त्यांच्या मुलीला ब्लॅकमेल करून पैसे मागत होता. तिने आधीच त्याला १५ हजार रुपये दिले होते.
कॉलेज प्राचार्यांवरही आरोप
या घटनेत महाविद्यालयाच्या प्राचार्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडित तरुणीने तक्रार केल्यानंतर प्राचार्यांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी उलट मुलीला त्याची माफी मागायला लावली, असा धक्कादायक आरोप वडिलांनी केला आहे.